मणिपूर हिंसाचारात परकीय हात : माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे | पुढारी

मणिपूर हिंसाचारात परकीय हात : माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मणिपूरमध्ये भडकलेल्या हिंसाचारामागे परकीय हात असल्याचा संशय माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केला आहे. एका व्याख्यानात बोलताना त्यांनी हा संशय व्यक्त केला. देशांतर्गत सुरक्षा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, ईशान्य भारतातील बंडखोरांना या आधीपासून चीनकडून मदत मिळते आणि यापुढेही ती मिळत राहील, अशी भीती व्यक्त केली.

राजधानी दिल्लीत इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे राष्ट्रीय सुरक्षाविषयक परिसंवादात बोलताना नरवणे यांनी ईशान्येकडील अस्वस्थतेबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, सीमावर्ती राज्यांमधील अस्थिरता देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी योग्य नाही. मणिपूरच नव्हे, तर ईशान्येकडील अनेक बंडखोर संघटनांना या आधीपासूनच चीनकडून मदत मिळते आहे. यापुढेही ती मिळत राहील. सत्ताधारी याची दखल घेतील, असेही ते म्हणाले. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याबाबत नरवणे म्हणाले की, प्रत्यक्ष तिथे काम करणार्‍यांना नेमके काय करायला हवे, याचे ज्ञान असते. तिथे विदेशी शक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मणिपूर हिंसाचारात म्यानमारच्या सहभागाबाबत नरवणे म्हणाले की, अमली पदार्थांचा थायलंड, म्यानमार आणि लाओस हा गोल्डन ट्रँगल आहे. ते ईशान्य भारताच्या अतिशय जवळ आहेत. शिवाय, म्यानमारमध्ये नेहमीच अशांतता व लष्करी राजवट राहिली आहे. त्यामुळे अमली पदार्थांची तस्करी नेहमीच होत असते. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण वाढले आहे.

Back to top button