Gyanvapi Survey : एएसआय सर्वेक्षणाला स्थगिती! अलाहाबाद उच्च न्यायालयात उद्या पुन्हा सुनावणी | पुढारी

Gyanvapi Survey : एएसआय सर्वेक्षणाला स्थगिती! अलाहाबाद उच्च न्यायालयात उद्या पुन्हा सुनावणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Gyanvapi Survey : ज्ञानवापी प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने एएसआय सर्वेक्षणाला उद्या, गुरुवार (दि. 27) पर्यंत स्थगिती दिली आहे. या प्रकरणी उद्या दुपारी 3.30 ला पुन्हा सुनावणी होणार असून न्यायालयाने एएसआय अधिकाऱ्यांना सुनावणीदरम्यान उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद परिसरातील सर्वेक्षणावरील स्थगिती वाढवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 26) सायंकाळपर्यंत सर्वेक्षणाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती कायम ठेवत अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना गुरुवारी पुन्हा सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी मुस्लिम पक्षाच्या याचिकेवर बुधवारी सकाळी सुनावणीस सुरुवात केली. ही सुनावणी दुपारी एक वाजेपर्यंत चालली. त्यानंतर पुन्हा पुन्हा साडेचार वाजता या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली.

एएसआयच्या अतिरिक्त संचालकांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र दिले आहे की, ते जे काही काम करतील त्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. मात्र, ज्ञानवापी येथील सर्वेक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करताना मुस्लिम पक्षाने ऐतिहासिक वास्तू कोसळण्याची भीती व्यक्त केली होती. एएसआयच्या आश्वासनावर विश्वास नसल्याचेही त्यांनी म्हटले.

वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. याविरोधात मशीद समितीने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 26 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वेक्षणास स्थगिती दिली आणि मस्जिद समितीला वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील करण्यास सांगितले. मंगळवारी मशीद समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

Back to top button