‘लॉकडाउन’ लव्‍हस्‍टोरीचा भीषण अंत..! पत्‍नीसह सासू-सासर्‍याचा खून, पती ९ महिन्‍याच्‍या बाळासह पोलिसात हजर | पुढारी

'लॉकडाउन' लव्‍हस्‍टोरीचा भीषण अंत..! पत्‍नीसह सासू-सासर्‍याचा खून, पती ९ महिन्‍याच्‍या बाळासह पोलिसात हजर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तीन वर्षांपूर्वी कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरलं. कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाउन सुरु झाले. याच काळात आसाममध्‍ये तरुण-तरुणीने प्रेमात पडले. त्‍यांनी लग्‍नही केले. त्‍यांना मुलगाही झाला. मात्र दाम्‍पत्‍यामधील मतभेद वाढले. हे मतभेद एवढे टोकाला गेले की, अखेर तिघांच्‍या हत्‍येने या प्रेमप्रकरणाचा भीषण अंत झाला आहे.  या हत्‍याकांडाने संपूर्ण आसाम हादरला आहे. दरम्‍यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज ( दि.२६) हत्‍याकांडा झालेल्‍या निवासस्थानी भेट दिली. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन त्‍यांनी दिले आहे. ( Assam Triple Murder )

काेराेना ‘लॉकडाउन’ काळात प्रेम आणि काेर्ट मॅरेज

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आसाममधील गोलाघाट जिल्‍ह्यातील नजीबुर हमान बोरा ( वय २५) आणि संघमित्रा घोष (२४) यांची २०२० कोरोना लॉकडाउन काळात मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये दोघे कोलकात्याला पळून गेले. कोलकाता कोर्टात दोघांनी लग्‍न केले. मात्र संघमित्राच्‍या आई-वडिलांनी या नात्‍याला विरोध केला. त्‍यांनी तिला घरी परत आणले. मात्र नजीबूरसोबत जाताना तिने घरी चोरी केल्‍याचा आरापे संघमित्राच्‍या आई-वडिलांनी केला. पोलिसांनी संघमित्राला अटक केली. एक महिन्‍याच्‍या न्‍यायालयीन कोठडीनंतर तिची जामिनावर सुटका झाली.

Assam Triple Murder : पुन्‍हा एकत्र, मुलगाही झाला पण…

जानेवारी २०२२ मध्‍ये संघमित्रा पुन्‍हा एकदा नजीबूरसोबत पळून गेली. दोघेही चेन्‍नईला गेले. चेन्‍नईत ते पाच महिने राहिले. यानंतर पुन्‍हा गोलाघाटला परतले. दाम्‍पताला नोव्‍हेंबर २०२२ मध्‍ये एक मुलगा झाला. मात्र यानंतर काही महिन्‍यातच नजीबूर आणि संघमित्रामधील मतभेद वाढले. मार्च २०२३ मध्‍ये संघमित्रा आपल्या मुलाला घेऊन नजीबूरचे घर सोडून आई-वडिलांच्या घरी गेली. तिने नजीबूरविरोधात अत्याचार केल्याचा आरोप करत पोलिस तक्रार नोंदवली. पोलिसांनी नजीबुरला अटक केली.

जामीनावर सुटल्‍यानंतर आरोप-प्रत्‍यारोप

नजीबूरची २८ दिवसानंतर जामिनावर सुटका झाली. नजीबूरला आपल्या मुलाला भेटायचे होते, पण संघमित्राच्या कुटुंबीयांनी त्याला भेटू दिले नाही. खरं तर, 29 एप्रिल रोजी नजीबूरच्या भावाने संघमित्रा आणि तिच्या कुटुंबीयांवर नजीबूरवर हल्ला केल्याचा आरोप करत पोलिस तक्रार नोंदवली होती. दाम्‍पत्‍यामधील तणाव वाढले.

Assam Triple Murder : क्षणात सारं काही संपलं…

सोमवार २४ जुलै रोजी नजीबूर पुन्‍हा संघमित्राच्‍या घरी गेला. येथे पुन्‍हा दोघांमध्‍ये वाद झाला. हा वाद टोकला गेला. नजीबूरने पत्नी संघमित्रासह तिच्‍या आई-वडिलांची हत्‍या केली. यानंतर तो आपल्या नऊ महिन्यांच्या मुलाला घेवून त्‍याने घटनास्‍थळावरुन पलायन केले. नंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

याप्रकरणी आसामचे पोलीस प्रमुख जीपी सिंग यांनी ट्विट केले की, आरोपींविरुद्ध खून आणि घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भीषण हत्येचा तपास करण्यासाठी राज्य सीआयडी पथक नियुक्‍त करण्‍यात आले आहे. फॉरेन्सिक पथकांनाही पाचारण करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुख्‍यमंत्री सरमांची घटनास्‍थळी भेट

आसामचे मुख्‍यमंत्री सरमा यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्‍यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले की, पीडितेची बहीण अंकिता हिलाही आरोपींनी मारहाण केली. या घटनेच्या संदर्भात तिने मला एक पत्र लिहिले होते, परंतु ते मला मिळाले नाही. या प्रकरणाची राज्‍य सरकार सखोल चौकशी करणार असून, दोषीला कठोर शिक्षा केली जाईल, अशी ग्‍वाही त्‍यांनी संघमित्राच्‍या नातेवाईकांना दिली.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button