‘एनआयए’ची तामिळनाडूत धडक कारवाई, २१ ठिकाणी छापे | पुढारी

'एनआयए'ची तामिळनाडूत धडक कारवाई, २१ ठिकाणी छापे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने ( एनआयए ) आज ( दि. २३) तामिळनाडूमध्ये २१ ठिकाणी छापे टाकले. ( NIA Raids )  तंजावर जिल्ह्यातील तिरुभुवनम येथे पट्टाली मक्कल काची (पीएमके) च्या माजी पदाधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणी ही कारवाई करण्‍यात आल्‍याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

रामलिंगम यांनी शहरातील काही कथित धर्मांतराच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मागील वर्षी कार बॉम्‍बस्‍फोटात २९ वर्षीय रामलिंगम यांचा मृत्‍यू झाला होता. याप्रकरणी ‘एनआयए’ने यापूर्वीच काही लोकांना अटक केली आहे, तर काही संशयित फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज तिरुनेलवेली जिल्ह्यातील सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) नेते मुबारक यांच्या घरावरही छापे टाकण्‍यात आले.

एनआयएच्‍या पथकाने आज  तंजावर, मदुराई, तिरुनेलवेली, तिरुपूर, विल्लुपुरम, त्रिची, पुदुकोट्टई, कोईम्बतूर आणि मायलादुथुराई या जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई केली. छापेमारीत मोबाईल फोन, सिम कार्ड, मेमरी कार्ड आणि कागदपत्रे जप्त करण्यात आल्‍याचे सूत्रांनी म्‍हटले आहे.

NIA Raids : बंदी आदेशानंतर ‘पीएफआय’च्‍या मुसक्‍या आवळल्‍या

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या दहशतवादी संघटनेवर बंदी घातल्यानंतर एनआयएने तामिळनाडूमध्ये अनेकवेळा छापे टाकले आहेत. राज्यातील अनेक सामाजिक संघटनांच्या बॅनरखाली बंदी घातलेल्या पीएफआयच्या पुनर्संस्थेच्या विरोधात राज्य आणि केंद्रीय संस्थांनी अलर्ट जारी केला आहे.

 

Back to top button