चांद्रयान पाचव्या कक्षेनंतर झेपावणार चंद्राकडे… | पुढारी

चांद्रयान पाचव्या कक्षेनंतर झेपावणार चंद्राकडे...

बंगळूर; वृत्तसंस्था : चौथी कक्षा वाढविल्यानंतर चांद्रयान सध्या 71351द233 कि.मी.च्या कक्षेत पृथ्वीभोवती फिरत आहे. याचा अर्थ चांद्रयान-3 अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. पृथ्वीच्या कमाल जवळ 233 कि.मी. आणि कमाल दूर 71351 कि.मी. असे हे लंबवर्तुळाकार अंतर आहे. आता 25 जुलै रोजी पाचव्यांदा ही कक्षा वाढवण्यात येणार असून, त्यानंतर यान चंद्राच्या दिशेने झेपावेल.

20 जुलैआधी 18 जुलै रोजी कक्षा (तिसर्‍यांदा) 51400 कि.मी. द 228 कि.मी.पर्यंत वाढवण्यात आली होती. 25 जुलै रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान पाचव्यांदा कक्षा वाढवण्यासाठी इंजिन फायर केले जाईल. पुढच्या टप्प्यात यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल आणि 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या स्लिंग शॉटच्या (गोफण तंत्र) माध्यमातून चंद्राच्या दिशेने जाईल. 5 ऑगस्टला चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या टप्प्यात यान येईल. स्लिंग शॉटने वळण घेईल. चंद्राच्या प्रदक्षिणा सुरू करेल. लंबवर्तुळाकार आकारात कक्षा कमी करत करत जाईल… आणि पुढे 23 ऑगस्टला ते स्लिंग शॉट तंत्राने चंद्रावर उतरेल.

लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 14 दिवस अध्ययन व प्रयोग करतील. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणार्‍या रेडिएशनचा अभ्यास करेल.

चांद्रयान-3 : घटनाक्रम

14 जुलै : चांद्रयान 36500 कि.मी. द 170 कि.मी.च्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले.
15 जुलै : पहिल्यांदाच कक्षा 41762 कि.मी. द 173 कि.मी.पर्यंत वाढविण्यात आली.
17 जुलै : दुसर्‍यांदा ती 41603 कि.मी. द 226 कि.मी. वाढवण्यात आली.
18 जुलै : तिसर्‍यांदा 51400 कि.मी. द 228 कि.मी. अशी कक्षा वाढविण्यात आली.
20 जुलै : कक्षा चौथ्यांदा 71351 कि.मी. द 233 कि.मी.पर्यंत वाढवण्यात आली.
25 जुलै : पाचव्यांदा कक्षा वाढवण्यात येणार आहे. नंतर यान चंद्राच्या दिशेने जाईल.

Back to top button