Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिद परिसराचे होणार एएसआय सर्वेक्षण | पुढारी

Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिद परिसराचे होणार एएसआय सर्वेक्षण

पुढारी ऑनलाईन डेस्क : वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) एएसआय सर्वेक्षणावरून मोठा निर्णय दिला आहे. वादग्रस्त भाग (वजुखाना) वगळता संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करावे असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना हा आदेश दिला आहे. मुस्लीम पक्षाने या सर्वेक्षणाला विरोध केला होता, मात्र न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकून सर्वेक्षणाला परवानगी दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली आहे. न्यायालयाने एएसआयला सर्वेक्षण करून 4 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

वाराणसीतील प्रसिद्ध शृंगार गौरी-ज्ञानवापी प्रकरणात मशिदीचे (Gyanvapi Mosque) सर्वेक्षण करण्याच्या याचिकेवर 14 जुलै रोजी सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. 16 मे 2023 रोजी हिंदू पक्षाच्या बाजूने चार फिर्यादी महिलांच्या वतीने एक अर्ज देण्यात आला, ज्यामध्ये ज्ञानवापी मशिदीचा वादग्रस्त भाग वगळता संपूर्ण परिसराचे एएसआय सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने एएसआय सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली आहे. कोणतेही नुकसान न करता शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण करावे, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. न्यायालयाने एएसआयच्या संचालकांना 4 ऑगस्टपर्यंत सर्वेक्षणासाठी पथक तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

Back to top button