Manipur Video Women Assaulted : महिला आयोगाला महिनाभरापूर्वीच तक्रार प्राप्त होऊनही दुर्लक्ष | पुढारी

Manipur Video Women Assaulted : महिला आयोगाला महिनाभरापूर्वीच तक्रार प्राप्त होऊनही दुर्लक्ष

पुढारी ऑनलाइन डेस्क : Manipur Video Women Assaulted : मणिपूर व्हायरल व्हिडिओतील महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात नवनवीन धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात पीडितेने इंडियन एक्रप्रेसला माहिती देताना पोलिसांनीच त्यांना जमावात नेऊन सोडल्याची धक्कादायक माहिती दिली होती. पोलिस जमावाच्या सोबत होते, असा आरोप पीडितेने केला. त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक तथ्य समोर आले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडे या घटनेची तक्रार 12 जून रोजीच प्राप्त झाली होती. ही तक्रार व्हिडिओ व्हायरल होण्यापूर्वी (व्हायरल व्हिडिओ तारीख 19 जुलै) 37 दिवस आधी महिला आयोगाला मिळाली होती. असे असतानाही महिला आयोगाकडून तक्रारीकडे महिनाभरापेक्षा जास्त काळ दुर्लक्ष करण्यात आल्याचे समोर आले आहे.

इंडिया टुडेने याचे वृत्त दिले आहे. त्यांनी म्हटले आहे, मणिपूरमधील महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या घटनांची नोंद राष्ट्रीय महिला आयोगाकडे (NCW) जूनमध्ये करण्यात आली होती. दोन महिलांना नग्नावस्थेत परेड केल्याचा भयानक व्हिडिओ समोर येण्याच्या एक महिन्यापूर्वी. इंडिया टुडेने म्हटले आहे की त्यांनी 12 जूनच्या तक्रारीची प्रत मिळवली आहे. ज्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या तीन प्रकरणांचा उल्लेख आहे. दोन महिलांना नग्नावस्थेत परेड केल्याचा व्हिडीओ समोर आल्याने संतापाची लाट उसळली आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Manipur Video Women Assaulted : महिला पॅनलकडून प्रतिसाद मिळाला नाही

राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यापूर्वी दोन कार्यकर्ते आणि एका ट्रायबल असोसिएशनने या लैंगिक हिंसाचारात बचावलेल्या पीडितांशी बोलले होते. मात्र, त्यांना महिला पॅनलकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या तक्रारीत म्हटले आहे. “आम्ही मणिपूरमध्ये चालू असलेल्या वांशिक संघर्ष आणि मानवतावादी संकटाकडे तुमचे गंभीर आणि तात्काळ लक्ष वेधून घेऊ इच्छितो. विशेषत: मणिपूर संघर्षात मोठ्या पुरुष गटाकडून आदिवासी महिलांवर करण्यात आलेल्या लैंगिक हिंसाचाराचे निराकरण करण्यासाठी आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही NCW ला तातडीचे आवाहन करतो,” असे तक्रारीत म्हटले आहे.

Manipur Video Women Assaulted : आम आदमी पक्षाकडून NCW प्रमुख रेखा शर्मांना हटवण्याची मागणी

दरम्यान, या प्रकरणी आम आदमी पक्षाने NCW प्रमुख रेखा शर्मा यांना हटवण्याची मागणी केली आहे, त्यांनी व्हिडिओ व्हायरल होण्याच्या काही दिवसांपूर्वी दाखल केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

Manipur Video Women Assaulted : व्हायरल व्हिडिओतील घटनांचा घटनाक्रम

मणिपूरमध्ये गेल्या 83 दिवसापासून मेईतेई आणि अन्य आदिवासी जमातीत संघर्ष पेटला आहे. 3 मे रोजी सर्व आदिवासी समुदायांनी मिळून आदिवासी एकता मार्च आयोजित केला होता. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर तिथे मोठा हिंसाचार उसळला. या हिंसाचारादरम्यान 4 मे रोजी मोठ्या पुरुष जमावाने दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली. तसेच त्यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले. आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी आलेल्या भावालाही या जमावाने ठार केले.

या घटनेची तक्रार दिल्यानंतर 21 जून रोजी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र, या घटनेवर प्रत्यक्ष कारवाई 19 जुलै रोजी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करण्यात आली. मणिपूर पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपीसह चौघांना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपीचा फोटो आणि माहिती उघड झाल्यानंतर संतप्त महिला जमावाने आरोपीचे घर जाळून टाकले आणि सरकारकडे कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारा दरम्यान 150 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button