महिलाही होईल देशाची लष्करप्रमुख

पुणे : एनडीएच्या दीक्षांत समारंभात बोलताना लष्करप्रमुख एम. एम. नरवणे. यावेळी कॅडेटस्नी संचलन केले.
पुणे : एनडीएच्या दीक्षांत समारंभात बोलताना लष्करप्रमुख एम. एम. नरवणे. यावेळी कॅडेटस्नी संचलन केले.
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) महिला व पुरुषांना समान तत्त्वावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला म्हणून त्यांच्या प्रशिक्षणात फरक केला जाणार नाही. त्यामुळे येत्या काही वर्षांत देशाची लष्करप्रमुख महिलाही होईल; तसेच भारतीय लष्कर अद्ययावत तंत्रज्ञानाने समृद्ध असून कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास सज्ज आहे', असा विश्वास देशाचे लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी पुण्यातील एनडीएच्या दीक्षांत समारंभात व्यक्त केला.

जनरल नरवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 29) एनडीएचा 141 वा दीक्षांत संचलन सोहळा येथील एनडीएच्या मैदानावर थाटात पार पडला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एनडीए परीक्षा महिलांसाठी खुली केल्याने काय फायदे होतील, देशाची सायबर सुरक्षा, युद्धविषयक सुसज्जता या विषयावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महिला व पुरुषांच्या प्रशिक्षणात फरक नाही

'चेन्नईतील लष्कराच्या ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीत महिलांचा आधीपासून समावेश आहेच. त्यांच्यासाठी थोड्या वेगळ्या पायाभूत सुविधा तयार कराव्या लागतात. त्याच धर्तीवर पुण्याच्या एनडीएत तयारी सुरू आहे. प्रशिक्षणाबाबत मात्र पुरुष आणि महिला कॅडेटमध्ये, तसेच प्रशिक्षण केंद्रांमध्येही कोणताही फरक केला जाणार नाही. आज मी जिथे उभा आहे, तिथे काही वर्षांनंतर महिला उभ्या असतील. म्हणजेच लष्करप्रमुख असतील', असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी एनडीए सज्ज

आगामी वर्षापासून मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी एनडीएत सर्व प्रकारची तयारी केली आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने लष्कराकडून हे पाऊल पडत आहे, असेही लष्करप्रमुख म्हणाले.

देशाच्या सायबर सुरक्षेवर बोलताना लष्करप्रमुख म्हणाले, 'सायबर सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे. सायबर हल्ल्याचा धोका टाळण्यासाठी लष्करात विशेष प्रशिक्षण व कार्यशाळा घेतली जात आहे.

भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानास तयार

गेल्या 30 ते 40 वर्षांत भारताची लष्करात काय प्रगती झाली आहे, भारत तांत्रिक आणि युद्धविषयक कसा सज्ज आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना लष्करप्रमुख म्हणाले, 'भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. देशाचे लष्कर युद्धनीतीनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवीन शस्त्रास्त्रे यावर सातत्याने भर देत असून विकसित होत आहे. कोणत्याही प्रकारचा सामना करण्यासाठी लष्कर सक्षम आहे.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news