ड्रेस, मेकअप आणि भाषेचे घेतले प्रशिक्षण : सीमा हैदरबाबत ‘गुप्‍तचर’ची धक्‍कादायक माहिती

ड्रेस, मेकअप आणि भाषेचे घेतले प्रशिक्षण : सीमा हैदरबाबत ‘गुप्‍तचर’ची धक्‍कादायक माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नेपाळमार्गे अवैधरित्‍या भारतात आलेली पाकिस्‍तानी नागरिक सीमा हैदर (Seema Haider)
हिच्‍याबाबत दररोज नवनवीन धक्‍कादायक माहिती उजेडात येत आहे. भारतात येण्‍यापूर्वी भारतीय महिलांचा पेहराव कसा असताे. उत्तर भारतातील महिला मेकअप कशा करतात आणि त्‍यांची भाषा कशी असावी, याचे विशेष प्रशिक्षण सीमा हैदरने घेतले असावे, असे गुप्‍तचर विभागाच्‍या सूत्रांनी 'इंडिया टूडे'शी बोलताना सांगितले.

 Seema Haider : पेहराव, मेकअप आणि भाषेचे प्रशिक्षण

सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला तिच्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली. तिने उत्तर भारतातील ग्रामीण महिला ज्‍या पद्‍धतीने पेहराव करतात तसेच कपडे घातले होते. तसेच तिने उत्तर भारतीय महिला जसा मेकअप करतात तसाच करण्‍यासाठी व्यावसायिकांची मदत घेतली असावी, असे गुप्तचर सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले.

सीमा हैदर हिने अत्‍यंत काळजीपूर्वक उत्तर भारतातील महिलांचा पेहराव केला होता. तसेच सुरक्षा दलांची नजर चुकविण्‍यासाठी तिने तिच्‍या मुलांनाही अशाच प्रकारचे कपडे घातले होते. मानवी तस्‍करीतून भारत- नेपाळ सीमा ओलांडताना महिलांना  विशेषत: घरगुती मोलकरणी वाटावे, असेच कपडे घालण्याची ही पद्धत वापरली जाते. सीमा ओलांडतानाही सीमा हैदरने अशाच प्रकारची वेषभूषा केली होती. त्‍यामुळे या प्रकरणी मानवी तस्‍करीचाही पर्दाफाश झाला आहे.

सीमा हैदरचे वेषभूषावर विशेष लक्ष

भारतात येताना सीमा हैदरने आपल्‍या वेषभूषावर विशेष लक्ष दिले होते. त्‍याचबरोबर तिने भाषेसाठीही विशेष प्रशिक्षण घेतल्‍याचे दिसते. अशा प्रकारचे प्रशिक्षण नेपाळमध्ये कार्यरत असणारे पाकिस्तानी हँडलर्सद्वारे दिले जाऊ शकते. नेपाळ सीमा ओलांडून भारतात बेकायदेशीर कारवाया करण्यासाठी पाठवल्या जाणाऱ्या महिलांना असे भाषेचे प्रशिक्षण दिले जाते, असेही गुप्‍तचर विभागाने म्‍हटलं आहे.
सीमा हैदर ही १३ मे २०२३ रोजी भारत-नेपाळ सीमेवरून भारतात आली, या दाव्याची गुप्‍तचर विभाग पुष्टी करु शकलेला नाही. भारत-नेपाळ सीमेवरील सुनौली आणि सीतामढी सेक्टरमध्ये अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही, असे गुप्तचर सूत्रांनी म्‍हटल्‍याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.

 Seema Haider : सीमेवरील बस मार्गांची तपासणी

सीमा हैदर आणि सचिन मीना या दोघांनी गुप्‍तचर विभाग आणि एटीएसला दिलेल्‍या माहितीनुसार, रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत, विशेषत: सीमा हैदरने भारतात प्रवेश केला त्‍यादिवशीच्‍या १३ मे रोजी सीमेवरील बस मार्गांची तपासणी केली आहे. मात्र यातून ठोस माहिती मिळालेली नाही. ४ जुलै रोजी सीमा हैदरला बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याबद्दल स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. तर सचिन मीनाला अवैध स्थलांतरितांना आश्रय दिल्याबद्दल अटक करण्‍यात आली होती. तथापि, दोघांनाही स्थानिक न्यायालयाने 7 जुलै रोजी जामीन मंजूर केला आणि ते आपल्या चार मुलांसह ग्रेटर नोएडा येथील एका घरात एकत्र राहत होते. मात्र सीमा हैदरबाबत गुप्‍तचर विभागाने दिलेल्‍या माहितीनुसार उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने सीमा हैदर आणि सचिन मीना या दोघांनाही ताब्‍यात घेतले होते.

सचिन मीणाबरोबर ऑनलाईन गेम PUJB खेळताना सीमाची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. सीमा ही सचिन मीणा याला भेटण्‍यासाठी आपल्‍या चार मुलांसह नेपाळमार्ग भारतात आली. मात्र हा संपूर्ण प्रकारच संशयास्‍पद असल्‍याने उत्तर प्रदेश पोलिसांनी याची सखोल चौकशी सुरु केली होती. यानंतर गुप्‍तचर विभागासह दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केली. सोमवार १७ जुलै रोजी एटीएसने सीमा हैदर आणि तिचा कथित पती सचिन यांना ग्रेटर नोएडातील रबुपुरा गावातून ताब्यात घेतले. दोघांची सहा तास स्वतंत्रपणे चौकशी केली. सीमाचे फोन कॉल डिटेल्स, पाकिस्तानातून दुबई, नंतर काठमांडू आणि तेथून ग्रेटर नोएडापर्यंत पोहोचण्याची गोष्ट तपासली जात आहे.

दोन पासपोर्ट आणि चार मोबाईल फोनमुळे संशयाच्‍या भोवर्‍यात

पोलीस तपासामध्‍ये सीमाकडे दोन वेगवेगळे पासपोर्ट असल्‍याचे आढळले. तसेच तिच्‍याकडे चार स्‍मार्ट फोन असल्‍याचेही निदर्शनास आले. तसेच तिचा भाऊ पाकिस्तानी लष्करात असल्याची माहिती गुप्‍तचर विभागाला मिळाली आहे. दरम्‍यान दैनिक 'भास्‍कर'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, सीमाला उत्तर प्रदेश पोलिसांनी १४ दिवसांपूर्वी प्रथम अटक केली होती. मात्र आतापर्यंत पोलिस तिचे मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू शकलेले नाहीत.

'एटीएस'कडून सीमा हैदरची पुन्‍हा चौकशी सुरु

सीमाच्या नातेवाईकांचे पाकिस्तानी लष्कराशी असलेले संबंध उघड झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले आहे. सीमाचे काका पाकिस्तानी लष्करात सुभेदार असल्याचे समोर आले आहे. याशिवाय सीमाचा भाऊही पाकिस्तानी लष्करात आहे. अशा परिस्थितीत सीमा हैदरचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी यूपी एटीएसची चौकशी सुरू आहे. यूपी एटीएसचे पथक साध्या गणवेशात सचिनच्या राबुपुरा येथील निवासस्थानी पोहोचले. तिला ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.

सचिन मीनाच्‍या कुटुंबात सन्‍नाटा

सीमा हैदरला यूपी एटीएसच्या ताब्यात घेतल्यानंतर सचिन मीनाच्या घरात शांतता आहे. कुटुंबीयांनी घराचे दरवाजे बंद केले आहेत. घरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. सचिनचे कुटुंब सीमा हैदरबाबत चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले होते. सीमासोबत सचिनही मीडियासमोर प्रश्नांची उत्तरे देत होता. यूपी एटीएसची कारवाई होताच. कुटुंबीयांनी चर्चा टाळली आहे.

सीमा हैदरचे ओळखपत्र उच्चायुक्तालयाकडे पाठवले

सीमा हैदर प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी पाकिस्तानी महिलेच्या तपासाला गती दिली आहे. पाकिस्तानातही या मुद्द्यावरून खळबळ उडाली आहे. कट्टरपंथी शक्ती सीमा हैदरचा शिरच्छेद करण्याच्या धमक्या देत आहेत. दरम्यान, तपास यंत्रणांनी सीमा हैदरचे ओळखपत्र उच्चायुक्तालयाकडे पाठवल्याचे वृत्त आहे. सीमा हैदरचे पाकिस्‍तानमध्‍ये नेमकं कोठे वास्‍तव्‍य होते, याचा तपास केला जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news