चांद्रयान-3 : 23 ऑगस्टला लँडर चंद्रावर उतरणार

चांद्रयान-3 : 23 ऑगस्टला लँडर चंद्रावर उतरणार
Published on
Updated on

* सुमारे 40 दिवसांनंतर म्हणजेच 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्युलपासून वेगळे होऊन लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील.
* दोघेही 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर विविध प्रयोग करतील, तर प्रोपल्शन मॉड्यूल ऑर्बिटरची भूमिका बजावेल.
* चंद्राच्या कक्षेत राहून प्रोपल्शन मॉडेल पृथ्वीवरून येणार्‍या रेडिएशनचा अभ्यास करेल. मिशनच्या माध्यमातून 'इस्रो' चंद्राचा पृष्ठभाग किती भूकंपप्रवण आहे, तेही शोधून काढेल. चंद्रावरील माती आणि धुळीचे अध्ययन, विश्लेषण केले जाईल.
* 'चांद्रयान-3' चे लाँचिंगसह बजेट सुमारे 615 कोटी रुपये आहे. चार वर्षांपूर्वीच्या 'चांद्रयान 2' वर 603 कोटी रुपयेच खर्च झाला होता. मात्र, त्याच्या लाँचिंगसाठी वेगळे 375 कोटी रुपये खर्च करण्यात आले.

लँडिंगचे ठिकाण पूर्वीचेच, पण…

'चांद्रयान-2' अंतर्गत लँडरला चंद्रावर जेथे उतरायचे होते, तेथेच (चंद्राच्या दक्षिण ध्रुवालगत 70 अंश अक्षांशावर) 'चांद्रयान-3' चे लँडरही उतरणार आहे.
…पण यावेळेस टार्गेटेड लँडिंग एरिया (उतरण्याचा लक्षित परिसर) वाढविण्यात आला आहे. 'चांद्रयान-2' मध्ये लक्षित परिसर 500 मीटर द 500 मीटर होता. 'चांद्रयान-3' मध्ये तो 4 कि.मी. द 2.5 कि.मी. आहे.
सर्व काही जमून आले, तर 'चांद्रयान-3' चंद्राच्या दक्षिण ध्रुवालगत सॉफ्ट लँडिंग करणारे जगातील पहिले स्पेसक्राफ्ट ठरेल. याआधी जगातील सर्वच स्पेसक्राफ्ट चांद्रमध्यरेषेच्या उत्तरेला वा दक्षिणेला काही अंश अक्षांशावर उतरलेले आहेत.

एक इंजिन काढण्यामागे इंधन क्षमतावाढीचा हेतू

गत मोहिमेप्रमाणे यावेळी लँडरमध्ये पाच इंजिन नसतील. यावेळी लँडरच्या मध्यभागी बसविण्यात आलेले इंजिन काढून घेण्यात आले आहे. इंधनाच्या टाकीला अधिक वाव देण्यात आला आहे. फायनल लँडिंग दोन इंजिनच्याच मदतीने होईल. काही अवचित घडले तरच उर्वरित दोन इंजिनांचा वापर केला जाईल.

कोट्यवधींनी पाहिले प्रक्षेपण

* 'चांद्रयान-3' चे प्रक्षेपण 'इस्रो'च्या अधिकृत संकेतस्थळावर आणि यूट्यूब चॅनेलवर थेट दाखवण्यात आले. दूरदर्शननेही 'चांद्रयान-3' चे थेट प्रक्षेपण प्रसारित केले.
* सतीश धवन स्पेस सेंटरच्या लाँच व्ह्यू गॅलरीमधूनही अनेकांनी प्रत्यक्ष प्रक्षेपणाचा आनंद लुटला.

चीनला अंतराळातही भारताचे प्रतिआव्हान!

* अमेरिका आणि रशियालाही चंद्रावर अनेक खस्ता खाव्या लागल्या होत्या. अनेक क्रॅशनंतर लँडिंगमध्ये यश आले होते.

* 2013 मध्ये चांग ई-3 मोहिमेंतर्गत पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर लँडिंग करण्यात यश मिळविणारा चीन हा एकमेव देश आहे. चीनने पुन्हा एका चांद्रमोहिमेची घोषणा केली आहे.

* जमिनीवर दिलेल्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर चीनला अंतराळातही प्रतिआव्हान देण्याचा भारताचा हेतू या मोहिमेमागे आहे.

अंतराळ संबंधित व्यवसायाची दालने भारतासाठी खुली होणार

* चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आणि त्यावर रोव्हर चालविण्यातही भारत तरबेज आहे, हे पाहिल्यानंतर उर्वरित जगात भारताबद्दलचा विश्वास दुणावणार आहे.

* एकाचवेळी मोठ्या संख्येने उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा उच्चांक प्रस्थापित केल्यानंतर अंतराळाशी संबंधित व्यवसायाची दालने भारतासाठी आधीच खुली झाली आहेत. ती अधिकच विस्तारतील.

* मेझॉनचे प्रमुख जेफ बेजॉस यांच्या ब्ल्यू ओरिजिन या अंतराळसंबंधित कंपनीने भारताच्या हेवी वेट लाँच व्हेईकल एलव्हीएम 3-एम 4 मध्ये नुसताच रस दाखविला नाही, तर ब्ल्यू ओरिजिन आपल्या क्रू कॅप्सूलसाठी याच रॉकेटचा वापर करेल, असा मनोदयही बोलून दाखविला.

चांद्रमोहीम म्हणजे 16 हजार शास्त्रज्ञ, अभियंत्यांची 15 वर्षे तपस्या!

* चांद्रमोहिमेंतर्गत भारताने 16 वर्षांत 3 चांद्रयान प्रक्षेपित केले आहे. हे सहजासहजी साध्य झालेले नाही. या 16 वर्षांत तिन्ही मोहिमांत मिळून 16 हजारांवर शास्त्रज्ञ, अभियंत्यांनी सातत्याने परिश्रम केलेले आहेत.
* 2008 आणि 2019 नंतर आता 2023 मध्ये असे 15 वर्षांत हे तिसरे चांद्रयान रवाना झालेले आहे.
* चंद्राला आपल्या मुठीत घेण्यासाठी भारताने तन, मन आणि धन असे सारेच समर्पित केलेले आहे.
* 15 ऑगस्ट 2003 रोजी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी चांद्रमोहिमेची औपचारिक घोषणा केली होती. नंतर शास्त्रज्ञ कामाला लागले.
* मयिलसामी अण्णादुराई यांच्या नेतृत्वात22 ऑक्टोबर 2008 रोजी चांद्रयान-1 लाँच झाले. नंतर दुसरी मोहीम पार पडली आणि आता तिसरी मोहीम सुरू झाली आहे.
* तिन्ही मोहिमांच्या योजना, आकृतीबंध आणि उभारणीसाठी आलेला खर्चही थोडाथोडका नाही. हा खर्च तब्बल 1979 कोटी रुपये आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news