

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्सने आज गुरुवारी विक्रमी ६६ हजार अंकाला गवसणी घातली. शेअर बाजारातील इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्सने ६६ हजारांचा टप्पा पार केला. तर निफ्टी १९,५५० वर पोहोचला. शेअर बाजारात चौफेर खरेदी दिसून येत आहे. बाजारातील तेजीत रिलायन्स, एचडीएफसी बँक आणि आयटी स्टॉक्स आघाडीवर आहेत.
सेन्सेक्स आजच्या व्यवहारात ६०० अंकांनी वाढून ६६ हजारांवर पोहोचला. तर निफ्टी १७० अंकांनी वाढून १९,५५४ वर व्यवहार करत आहे. जूनमधील अमेरिकेतील महागाईचा दर अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे ३ टक्क्यांवर आला. दोन वर्षांतील हा सर्वात कमी महागाई दर आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी आली आहे.
काल बुधवारी सेन्सेक्स ६५,३९३ वर बंद झाला होता. तो आज ६५,६६७ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने आज ६६,०५२ वर झेप घेतली. सेन्सेक्सवर टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, विप्रो, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक हे शेअर्स वधारले आहेत. तर पॉवर ग्रिड, मारुती, नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर हे घसरले आहेत.
अमेरिकेसह आशियाई बाजारात तेजीचे वातावरण आहे. अमेरिकेतील एस अँड पी ५०० आणि डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज आणि नॅस्डॅक कंपोझिट हे निर्देशांक वाढून बंद झाले. तर आशियाई बाजारातील जपानचा निक्केई, दक्षिण कोरियाचा कोस्पी, हाँगकाँगचा हँगसेंग आणि शांघाय कंपोझिट हे वधारले आहेत.
हे ही वाचा :