ISRO Chandrayanna 3 मोहिमेच्‍या यशासाठी शास्त्रज्ञांची टीम तिरुपतीच्‍या दर्शनाला

चांद्रयान-3 मोहिमेपूर्वी आज  ISRO शास्त्रज्ञांची टीम चांद्रयान-3 चे लघु प्रतिकृतीसह तिरुपती व्यंकटचलपती मंदिरात पोहोचली.
चांद्रयान-3 मोहिमेपूर्वी आज ISRO शास्त्रज्ञांची टीम चांद्रयान-3 चे लघु प्रतिकृतीसह तिरुपती व्यंकटचलपती मंदिरात पोहोचली.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चांद्रयान-3 मोहिमेसाठी सज्‍ज झाली आहे. तत्‍पूर्वी आज ISRO शास्त्रज्ञांची एक टीम चांद्रयान-3 चे लघु प्रतिकृतीसह आंध्र प्रदेशातील तिरुपती व्यंकटचलपती मंदिरात पोहोचली. त्‍यांनी मंदिरात मोहिमेच्‍या यशासाठी पूजा केली. ( ISRO Chandrayanna 3 )

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शुक्रवार, १४ जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता चांद्रयानचे प्रक्षेपित होणार असल्‍याची घोषणा इस्रोने केली आहे. तत्‍पूर्वी आज ISRO शास्त्रज्ञांची एक टीम चांद्रयान-3 चे लघु प्रतिकृतीसह आंध्र प्रदेशातील तिरुपती व्यंकटचलपती मंदिरात पोहोचली. त्‍यांनी मंदिरात मोहिमेच्‍या यशासाठी पूजा केली.

मंगळवार,११ जुलै रोजी इस्रोने चांद्रयान-3 चंद्रावर उतरवण्याची यशस्वी रंगीत तालीम केली होती.यानंतर इस्रोने ट्विटमध्ये म्‍हटलं होतं की, संपूर्ण प्रक्षेपणाची तयारी आणि डमी स्वरूपात २४ तासांची तालीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. चांद्रयान-३ चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे.

श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 (Chandrayaan-3) प्रक्षेपित केले जाईल. चांद्रयान-2 मोहिमेत चंद्रावर उतरतानाच लँडर कोसळले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, 'इस्रो'चे तत्कालीन प्रमुख सीवन यांच्यासह अवघा देश त्या प्रसंगाने हळहळला होता. लँडिंग यशस्वी होते की नाही म्हणून भीतीच्या सावटाखाली अवघ्या देशाने घालविलेली ती 15 मिनिटे आजही अंगावर काटा उभा करतात.

चंद्राला स्पर्श करण्याचे अपूर्ण राहिलेले ते स्वप्न यावेळी पूर्ण व्हावे म्हणून 'इस्रो'ने कुठलीही कसर सोडलेली नाही. चांद्रयान-1 पूर्णपणे यशस्वी ठरलेले होते. त्यामुळे चांद्रयान-2 ही पूर्वयशावर आधारलेली मोहीम होती; पण तिला मर्यादित यश मिळाले. आपण चंद्रावर स्थिरावू शकलो नाही. त्यामुळे चांद्रयान-3 ही मोहीम चांद्रयानच्या अपयशावर (मर्यादित) आधारलेली आहे. ज्या-ज्या कारणांनी हे अपयश आले, त्या-त्या कारणांचे सखोल अध्ययन 'इस्रो'ने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) केले आणि आनुषंगिक बदल नव्या मोहिमेत केलेले आहेत.

अपयशाधारित द़ृष्टिकोनाची (फेल्युअर बेस्ड प्रोच) या मोहिमेसाठी केलेली निवड सार्थ ठरावी म्हणून अवघा देश आतापासून उत्सुक आहे.

 ISRO Chandrayanna 3 : 'नासा'पासून 'इस्रो'पर्यंत सार्‍यांचा लाडका चंद्र का?

'इस्रो' चांद्रयान-3 (Chandrayaan-3) साठी सज्ज आहे तसेच अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ही आर्टेमिस मोहिमेवर सध्या काम करत आहे. चीनलाही चंद्रावर आपला जम बसवायचा आहे. अंतराळ शास्त्रज्ञांसाठीही चंद्र इतका खास का आहे? सूर्यमालेसह ब्रह्मांडातील अन्य ग्रहांवरील मानवाच्या प्रवेशाचे दरवाजे चांद्रमोहिमांतूनच खुले होणार आहेत, हे त्यामागचे कारण होय.

चंद्र हा पृथ्वीपासूनच बनलेला आहे. पृथ्वीच्या प्रारंभिक इतिहासाची चंद्र हा एक साक्ष आहे. विविध भूवैज्ञानिक प्रक्रियांमुळे या इतिहासातील ज्या नोंदी पृथ्वीवरून संपुष्टात आल्या आहेत, त्या चंद्रावर आजही सुरक्षित आहेत.चंद्रावरील संशोधनातून पृथ्वीच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडेल. पृथ्वीवर भूतकाळात आदळलेल्या एस्टरॉईडस्चे (लघुग्रहाचे) आनुषंगिक परिणाम अभ्यासणे व पृथ्वीचे भवितव्य काय ते जाणून घेणे, हे हेतूही आहेतच. तापमान आणि अन्य टोकाच्या परिस्थितीत सामग्री, उपकरणांच्या परीक्षणाची संधी चंद्र उपलब्ध करून देतो. हा पूर्वानुभव नव्या ग्रहांवरील मोहिमांसाठी उपयुक्त ठरणारा आहे.

 ISRO Chandrayanna 3 : भारतच खरा चंद्रावरील 'खतरों का खिलाडी!'

अमेरिका, रशिया, चीन या देशांनी आपापल्या यानांचे लँडिंग चंद्राच्या उत्तर ध्रुवावर केले आहे.
भारताची चांद्रयान-3 ही मोहीम मात्र चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काम करणार आहे.
चांद्रयानातून लँडर चंद्रावर अशा ठिकाणी उतरेल, जे ठिकाण कधीच पृथ्वीसमोर येत नाही.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील टेक्टॉनिक प्लेट कमालीची सक्रिय असल्याने येथे सतत भूकंप होत असतात.
चंद्राच्या या भागात मोठ्या प्रमाणावर बर्फ असावे, ही शक्यता आहे. या भागाबद्दल फारशी माहिती जगाला नाही. ती मिळावी म्हणून…

'चांद्रयान-2'मधील चुका

'चांद्रयान 2'मध्ये चांद्रकक्षेतून उतरताना लँडरला वेगाने वळायचे होते; पण जसे ते वळले, त्याचा वेग कमी झाला. असे काही घडेल, याची 'इस्रो'ने कल्पनाही केली नव्हती. 'चांद्रयान 2'मध्ये लँडरचे उतरण्याचे ठिकाण म्हणून एक लहानसे वर्तुळ (500 बाय 500 मीटर) निश्चित करण्यात आले होते.

चंद्राचा पृष्ठभाग हा समतल नाही. ओबडधोबड आहे. आधीच लँडर पृष्ठभागाच्या फार जवळ पोहोचलेले होते. उतरण्याचे ठिकाण छोटेसे आणि ते शोधण्याच्या गडबडीत लँडर स्वत:चा वेग कमी करण्याऐवजी वाढवत होते. एकीकडे लँडिंगचे ठिकाण हेरून तेथे पोहोचायचे होते, तर दुसरीकडे वेगही मर्यादित ठेवायचा होता. खड्डे आणि दीर्घकाळ अंधारामुळेही लहानसा लँडिंग स्पॉट हेरण्यात समस्या उद्भवली.

चंद्रावर वातावरण नसल्याने लँडरचा वेग उतरताना हळुवार करत नेण्यासाठी विशिष्ट ब्रेकिंग सिस्टिमसह विशिष्ट इंधन (प्रणोदक) लागते. तेही पुरेल एवढेच होते. एका क्षणाला लँडरने स्थिर होऊन चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घ्यायची (उतरण्याचे ठिकाण निश्चित करण्यासाठी) होती; पण नेमका यावेळी इंजिनांनी अपेक्षेहून जास्त वेग निर्माण केला. (लँडरमधील या 5 इंजिनांचे काम वेग कमी करणे, हे होते) लँडरचा वेग वाढला आणि ते अस्थिर झाले. मार्गक्रमणच भरकटले.

 ISRO Chandrayanna 3 : चांद्रयान-3'मधील सुधारणा

आता तसे घडू नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे चांद्रयान 3 मोहिमेत लँडरचे उतरण्याचे ठिकाण 4 कि. मी. बाय 2.5 कि.मी. निश्चित करण्यात आले आहे. एका ठिकाणी लँडिंगला अडचण आल्यास पर्यायी ठिकाण निवडण्यासाठी प्रवासातील संभाव्य वाढ गृहित धरून इंधनाचे प्रमाणही वाढविलेले आहे. ऊर्जानिर्मितीत खंड पडू नये, अशी व्यवस्था नव्या मोहिमेत करण्यात आली आहे. नव्या मोहिमेत लँडरसह अतिरिक्त सौर पॅनल्सही आहेत.
'चांद्रयान 3' मधील सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि लँडिंगच्या एकुणातील प्रक्रियेत तपशिलवार संशोधनाअंती सकारात्मक बदल झालेले आहे. चंद्रयान-3 च्या प्रक्षेपणाचा मार्ग तसूभरही बदलणार नाही आणि इस्रोचा त्याच्याशी असलेला संपर्कही तुटणार नाही, अशी एकुणातील तजवीज आहे. त्यामुळे यशस्वी लँडिंगच्या आशेला नव्या मोहिमेत आकाशही ठेंगणे आहे.

चंद्रावरील लँडिंग सूर्योदयाच्या आधारावर

लँडिंग करताना सूर्यप्रकाश असला पाहिजे म्हणून चंद्रावर सूर्योदय केव्हा होईल, या आधारावरच चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगची तारीख निश्चित केली जाते. चंद्रावर सलग 14-15 दिवस सूर्यप्रकाश (दिवस) असतो आणि पुढे सलग 14-15 दिवस रात्र असते.

हेही जाणून घ्या…

चंद्रयान-3 च्या लँडरमध्ये 4 आणि रोव्हरमध्ये 2 पेलोड आहेत. चंद्राच्या कक्षेतून अत्याधुनिक उपकरणे पृथ्वीच्या ध्रुवमितीचे अध्ययन करतील.
चांद्रयान-2 प्रमाणेच चांद्रयान-3 मधील लँडरचे नाव विक्रम (भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई), तर रोव्हरचे नाव प्रज्ञान हेच असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news