जयपूर : भरतपूर येथे पोलिसांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून भाजप नेते कृपाल जघिना हत्याकांडातील आरोपी आणि गँगस्टर कुलदीप जघिना याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दुसरा आरोपी विजयपाल हाही यात गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास अमोली टोल प्लाझाजवळ घडली.
कुलदीप आणि त्याचा साथीदार विजयपाल यांना पोलिस अजमेर येथून बसमधून भरतपूर न्यायालयात घेऊन जात होते. अमोली टोल प्लाझा येथे बस थांबली असता, तेथे दबा धरून बसलेले दोघे जण बसमध्ये चढले. त्यांनी पोलिसांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकली. पाठोपाठ कुलदीपवर 15 गोळ्या झाडल्या. त्यात तो ठार झाला.