

नवी दिल्ली ; जाल खंबाटा : बदलत्या हवामानांचा कॉफी चे उत्पादन आणि त्याच्या चवीवरही परिणाम होत असल्याचे नवीन संशोधनातून समोर आले. उत्पादनात होणार्या घटीमुळे त्याचा परिणाम अर्थकरणावरही बसत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. जगातील 50 पेक्षा जास्त देशांत सुमारे 12.5 दशलक्ष शेतकरी 27 दशलक्ष एकरात कॉफीचे पीक घेतात.
कॉफीची चव आणि सुगंधावर वेगवेगळ्या देशातील हवामानाचा परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा आता चिंतेचा विषय ठरत आहे.कॉफी उत्पादनावर परिणाम करणार्या घटकांचा खरेदीदारांच्या आवडीवर, कॉफीच्या किमतीवर आणि पिकवणार्या शेतकर्यांच्या उपजीविकेवर मोठा प्रभाव पडतो, असे प्रा. सीन कॅश यांनी म्हटले आहे.
बदलत्या हवामानामुळे कॉफी पिकांवर होणार्या परिणामांमुळे जगाचे अर्थकारण बिघडत असून आम्ही या बदलामागचे विज्ञान समजू शकलो, तर शेतकरी आणि अन्य भागधारकांना या आव्हानाला तोंड देत असताना कॉफी उत्पादन कसे वाढवता येईल याचे व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते, असे प्रा. कॅश यांनी म्हटले आहे. संशोधकांनी यासाठी हवामान अनुकूलतेशी संबंधित 10 पर्यावरणीय घटक आणि व्यवस्थापन परिस्थितीचे काय परिणाम होतात याचा अभ्यास केला.
सर्वात जास्त उंचीवर पिकवल्या जाणार्या कॉफीचा चव आणि सुगंध आणि त्याच्या गुणवत्तेत घट होण्यास प्रकाशाचा अधिक संपर्क असल्याचे आढळून आले. कॉफीच्या गुणवत्तेत पाण्याचा ताण आणि वाढलेले तापमान आणि कार्बनडाय ऑक्साईडमुळे बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे या विशिष्ट घटकांचे अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.