honey trap : केव्हा अन् कसे आले हनी ट्रॅप | पुढारी

honey trap : केव्हा अन् कसे आले हनी ट्रॅप

संरक्षण संशोधन विकास संस्थेचा (डीआरडीओ) प्रदीप कुरूलकर हा पाकिस्तानच्या हनी ट्रॅपची शिकार ठरला आहे. भारतीय लष्करासह संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती मिळविण्यासाठी आयएसआय हनी ट्रॅपच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकार्‍यांना आपल्या जाळ्यात ओढत आहे. पाकिस्तानी ललनांचा यासाठी वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी हनी ट्रॅपचा थोडक्यात आढावा…

पहिल्या महायुद्धात सर्वप्रथम वापर

पहिल्या महायुद्धात हनी ट्रॅपचा पहिल्यांदा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर ब्रिटिश लेखक कैरे यांनी आपल्या कादंबरीत 1974 मध्ये हनी ट्रॅपचा शब्दप्रयोग केला. महायुद्धात जर्मन सैनिकांना हनी ट्रॅपच्या माध्यमातून जाळ्यात अडकले होते. शीतयुद्धातही याचा रशियाने खुबीने वापर केला होता.

महिला विद्यापीठात आयएसआयकडून तरुणींची निवड

रावळपिंडीत पाक लष्कराचे मुख्यालय आहे. या ठिकाणी फातिमा जिना महिला विद्यापीठात सौंदर्यवतींची निवड करून हनी ट्रॅपचे प्रशिक्षण दिले जात आहे. तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या हस्तेच सोशल मीडियाचे उद्घाटन झाले होते. रावळपिंडी, हैदराबाद या ठिकाणी 2022 मध्ये आयएसआयने दोन कॉल सेंटर सुरू केली आहेत.

भारतात 1980 मध्ये पहिली केस

भारतात सर्वप्रथम 1980 मध्ये हनी ट्रॅपचा प्रकार उघडकीस आला होता. रॉ चे तत्कालीन अधिकारी के. व्ही. उन्नीकृष्णन यांना पाकच्या ललनांकडून हनी ट्रॅपमध्ये अडकविले होते.

रावळपिंडी, कराचीत हनी ट्रॅपचे प्रशिक्षण

कित्येक वर्षांपासून पाकिस्तान हनी ट्रॅपचा अस्त्रासारखा वापर करीत आहे. कराची, रावळपिंडी, हैदराबाद आदी ठिकाणी आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडून तरुणींना हनी ट्रॅपचे प्रशिक्षण दिले जात आहे.

अश्लील चाळ्यातून जवळीक

प्रेमाचे नाटक आणि अश्लील चाळ्यातून संबंधितांना या जाळ्यात ओढले जाते. क्षेपणास्त्रे, ड्रोनसह भारतीय लष्करातील संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी ललना शारीरिक संबंधातूनही जवळीक साधतात. व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुकसह अन्य सोशल मीडियाचा वापर करीत आहेत.

हिंदू मुलींसारखा पोशाख

पाकमध्ये अनेक ठिकाणी कॉल सेंटर सुरू केले आहेत. ललनांना हिंदू मुलींसारखे दिसण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हिंदू तरुणींसारखा पोशाख करून बनावट प्रोफाईल सोशल साईटस्वर टाकले जाते. अधिकार्‍यांना हिंदू असल्याची बतावणी करून अलगद जाळ्यात ओढले जाते.

सापळा असा लावतात

या तरुणी मादक सौंदर्याने भुरळ घालतात. डेटा मायनिंग, किवर्ड टायपिंगच्या माध्यमातून संवेदनशील माहिती गोळा केली जाते. एका तरुणीवर 50 प्रोफाईल हँडल करण्याची जबाबदारी सोपविली जाते. हेअर कटिंगवरून पाक ललना अधिकार्‍यांना फॉलो करतात.

सेलिब्रिटींही ब्लॅकमेल

सेलिब्रिटींना ब्लॅकमेल करण्यासाठीही हनी ट्रॅपचे हत्यार वापरले जात आहे. राजकीय नेते, सिनेअभिनेते, उद्योगपतींसह बड्या असामींना ब्लॅकमेल करण्यासाठीही ललना अलीकडे याचा वापर करीत आहेत.

Back to top button