रामनवमीला जन्ममुहूर्तावर रामाच्या भाळी सूर्याची किरणे! | पुढारी

रामनवमीला जन्ममुहूर्तावर रामाच्या भाळी सूर्याची किरणे!

अयोध्या; वृत्तसंस्था :  2024 मध्ये मकर संक्रांतीनंतर एका शुभ मुहूर्तावर रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. आगामी वर्षातच चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात येणार्‍या रामनवमीला दुपारी 12 वाजता सूर्याची किरणे प्रभू रामाच्या कपाळावर पडतील, अशी व्यवस्था केली जात आहे. त्यावर खगोलशास्त्रज्ञ आणि मूर्तिकार मिळून आपले कसब पणाला लावत आहेत.

अयोध्येत उभारल्या जाणार्‍या राम मंदिरांतर्गत तळमजल्यावरील छत तयार झाल्यानंतर पहिल्या मजल्यावरील खांब उभारले जात आहेत. पहिल्या मजल्यावरच राम दरबार बांधला जाईल. तळमजल्यावरील गर्भगृहात रामलल्ला हे लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे बंधू आणि बजरंग बलींसोबत प्रतिष्ठापित होतील. नगारा शैलीत राम मंदिर बांधले जात असून तळमजल्यावर पाच मंडप आहेत. मुख्य मंडपातून पताका फडकावली जाईल. तळमजल्यावरील 166 खांबांवर मूर्ती कोरण्याचे काम सुरू आहे. मंदिराच्या गर्भगृहातील सहा खांब संगमरवरी आहेत. दर्शनासाठीच्या 32 पैकी 24 पायर्‍या बांधून झाल्या आहेत.

आकडे बोलतात…

700 मीटर लांबीचा रस्ता रामलल्लांपर्यंत जाण्यासाठी…
400 लोक एकाच वेळी रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था.
25 हजार प्रवाशांसाठी निवास केंद्रे बांधण्यात येणार आहेत.
8 एकर जागेवर मंदिराबाहेर उद्यान उभारले जात आहे.

Back to top button