पुढारी ऑनलाइन डेस्क : Pankaja Munde : सोनिया आणि राहुल गांधी यांची भेट घेतली का? या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली आहे, अशा बातम्या येत असून त्याची चर्चा होत आहे. या सर्व प्रश्नांवर पंकजा मुंडे यांनी अखेर पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. वाचा काय म्हणाल्या पंकजा मुंडे…
मी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतलेली नाही. भेट सोडा मी त्यांना ओळखत देखील नाही. जेव्हा या बातम्या आल्या तेव्हा मी मध्यप्रदेशमध्ये पक्षाच्या कार्य करत होते. मी पक्ष सोडणार असल्याची सातत्याने चर्चा होत असते. मात्र माध्यम चुकीच्या बातम्या दाखवत आहेत. मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही. मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. तसेच सोनिय आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याच्या चुकीच्या बातम्या ज्या वाहिनीने पसरवल्या आहेत, त्यांच्यावर मी मानहानीचा दावा ठोकणार आहे, असेही त्यांनी म्हटेल आहे.
मला पक्षातून अनेक वेळा डावलण्यात आले आहे. 2019 मध्ये तिकीट देतो असे सांगून तिकीट मिळाले नाही. मात्र, असे असले तरी मी कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. कधीही त्यावर बातम्या लावा असे सांगितले नाही. पक्षाचा आदेश मी प्रत्येक वेळी स्वीकारला. मी कधीही याविषयी सोशल मीडियावरही बोलले नाही. पक्षाचा आदेश सर्वतोपरी आहे आणि हेच आमचे संस्कार आहे. तसेच मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, मी भाजपमध्येच राहणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. तसेच मी यावर पुन्हा-पुन्हा स्पष्टीकरण देणार नाही, असे सांगितले. तसेच पक्षानेही स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मात्र, याच वेळी पंकजा मुंडे यांनी मी नाराज नाही मात्र दुःखी आहे. असेही म्हटले. माझ्याविषयी चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात यामुळे वेदना होतात. असेही त्या म्हणाल्या.
सध्या राज्याच्या राजकारणात जे काही सुरू आहे त्यावर भाष्य करत पंकजा मुंडे म्हणाल्या मी पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांमधून नाही. मात्र, जनतेचा देखील विचार करावा लागणार आहे. जनतेला पाडापाडीच्या राजकारणाचा कंटाळा आला आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणाच साधला. मात्र त्याच वेळी त्या म्हणाल्या की मला अनेकदा डावलूनही मी कधी नाराजी व्यक्त केली नाही. मात्र, राज्याच्या राजकारणात काहीही घडले तरी चर्चा माझीच होते. सातत्याने मी भाजप सोडणार अशी चर्चा होते. मात्र, मी स्वतः कधीही असे काहीही म्हटलेले नाही. पक्षालाही माझा सन्मान वाटत असेल.
मी कधीही डगमगणार नाही. मी खंबीर आहे. माझे कार्यकर्ते माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत. जनता माझ्या पाठीशी आहे. मात्र, सध्या मला एका ब्रेकची गरज आहे. मी दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाणार असून या काळात कोणीही कृपया मला प्रश्न विचारू नये, अशी विनंती देखील त्यांनी माध्यमांना केली आहे.
हे ही वाचा :