Russian Crude Oil : रशियन क्रूड तेलाच्या आयातीमुळे भारताची ७ अब्ज डॉलर्सची बचत | पुढारी

Russian Crude Oil : रशियन क्रूड तेलाच्या आयातीमुळे भारताची ७ अब्ज डॉलर्सची बचत

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मागील १४ महिन्यांपासून केल्या जात असलेल्या रशियन क्रूड तेलाच्या आयातीमुळे सुमारे सात अब्ज डॉलर्सची बचत झाली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान युध्द सुरु झाल्यानंतर अमेरिका तसेच पाश्चिमात्य देशांनी रशियन क्रूड तेलाच्या आयातीवर निर्बंध घातले होते. तर दुसरीकडे असे निर्बंध असूनही भारताने मित्र देश असलेल्या रशियाहून कच्च्या तेलाची (Russian Crude Oil)  आयात करण्याचा निर्णय घेतला होता.

भारत हा क्रूड तेलाचा (Russian Crude Oil)  जगातला तिसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे. लागणाऱ्या एकूण तेलापैकी ८५ टक्के तेलाची आयात भारत विविध देशांतून करीत असतो. यातील रशियाहून आयात केल्या जाणाऱ्या डिस्काउंटेड तेलाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. रशियाकडून केवळ भारतालाच नव्हे, तर चीनलाही सवलतीच्या दरात क्रूड तेलाचा पुरवठा केला जातो.

काही वर्षांपूर्वीपर्यंत रशियाहून आयात केल्या जाणाऱ्या तेलाचे प्रमाण अत्यंत नगण्य होते. तथापि दीड वर्षात रशिया हा भारताचा सर्वात मोठा तेल आयातदार देश ठरला आहे. एप्रिल २०२२ ते मे २०२३ या कालावधीत भारताने रशियाकडून तब्बल १८६.४५ अब्ज डॉलर्स इतक्या किंमतीचे कच्चे तेल खरेदी केले होते. सवलतीच्या दरात जर हा तेलाचा पुरवठा झाला नसता तर देशाला १९३.६२ अब्ज डॉलर्स इतके द्यावे लागले असते. थोडक्यात सवलतीच्या दरातील रशियन क्रूड खरेदीमुळे भारताची सात अब्ज डॉलर्सची बचत झाली आहे.

हेही वाचा 

Back to top button