HDFC-HDFC Bank merger | ‘एचडीएफसी’च्या भागधारकांची चांदी, २५ शेअरच्या बदल्यात मिळणार ४२ शेअर

HDFC-HDFC Bank merger | ‘एचडीएफसी’च्या भागधारकांची चांदी, २५ शेअरच्या बदल्यात मिळणार ४२ शेअर

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी) आणि एचडीएफसी बँक यांच्यातील विलीनीकरणाला बँकेच्या संचालक मंडळाची शुक्रवारी अंतिम मंजुरी मिळाली. ही बहुप्रतीक्षित विलीनीकरणाची प्रक्रिया एक जुलैला पूर्ण होणार आहे. त्यानंतर 'एचडीएफसी बँक लिमिटेड' ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बँक होईल. (HDFC-HDFC Bank merge)

विलीनीकरणानंतर बँकेचे भांडवली मूल्य 175 अब्ज डॉलर एवढे असेल. म्हणजेच 1970 च्या दशकात दीपक पारेख यांनी सुरू केलेल्या 'एचडीएफसी' या खासगी वित्तपुरवठा संस्थेचे अस्तित्व एक जुलैनंतर संपुष्टात येईल. 'एचडीएफसी'ने आतापर्यंत एक कोटीहून अधिक ग्राहकांना घरासाठी कर्ज पुरवले आहे. विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेमार्फत घरांसाठी कर्जपुरवठा होईल.

इतिहासातील मोठा व्यवहार

दोन्ही मोठ्या संस्थांमधील हा व्यवहार 40 अब्ज डॉलरचा आहे. देशातील कंपन्यांच्या इतिहासातील हा सर्वात मोठा व्यवहार आहे. या विलीनीकरणानंतर वित्तीय सेवा देणारी देशातील एक मोठी कंपनी समोर येईल. या दोन्ही संस्थांमधील विलीनीकरणाची प्रक्रिया अभूतपूर्व आहे. या विलीनीकरणामुळे 168 अब्ज डॉलरची बँक उभी राहणार आहे. या विलीनीकरणाचा परिणाम देशातील लाखो ग्राहक आणि शेअर्सहोल्डर्सवर दिसून येईल.

भागधारकांची होणार चांदी

एचडीएफसीचे शेअर 13 किंवा 14 जुलैपर्यंत बाजारात कार्यरत राहतील. त्यानंतर 17 जुलैपासून हे शेअर एचडीएफसी बँकेचे शेअर म्हणूनच ओळखले जातील. एका एचडीएफसी भागधारकाला त्याच्याकडील 25 शेअरसाठी एचडीएफसी बँकेचे 42 शेअर मिळणार आहेत. एका अर्थाने सध्याच्या एचडीएफसीच्या भागधारकांकडे एचडीएफसी बँकेची 41 टक्के मालकी येईल.

नवे बदल कोणते?

एचडीएफसी व एचडीएफसी बँक या दोन्हींच्या सध्याच्या कर्जधारकांच्या व्याज दरात निव्वळ या विलीनीकरणामुळे बदल होणार नाहीत, असे पारेख यांनी स्पष्ट केले आहे. सध्याच्या ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच सेवा मिळत राहील. मात्र, नव्या गृहकर्जांना आता एचडीएफसी बँकेचे नियम लागू असतील. एचडीएफसीतील ग्राहककेंद्रित कार्यशैली बँकेत आणण्यासाठी त्या संस्थेतील साठीच्या आतील सर्व कर्मचार्‍यांना बँकेत सामावून घेतले जाणार आहे.

ठरणार चौथी सर्वात मोठी बँक

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांचे विलीनीकरण झाल्यानंतर नव्याने अस्तित्वात येणारी बँक जगातील चौथी सर्वात मोठी बँक ठरणार आहे. जे. पी. मॉर्गन चेस अँड कंपनी, इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना आणि बँक ऑफ अमेरिका कॉर्पोरेशन या अन्य तीन वित्तीय संस्था पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. (HDFC-HDFC Bank merge)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news