Rahul Gandhi Visit to Manipur : मणिपूरमध्ये राहुल गांधींचा ताफा रोखला; वाचा नेमकं काय घडलं? | पुढारी

Rahul Gandhi Visit to Manipur : मणिपूरमध्ये राहुल गांधींचा ताफा रोखला; वाचा नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Rahul Gandhi Visit to Manipur : काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या दोन महिन्यांपासून जातीय दंगलींमुळे त्रस्त असलेल्या मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी राहुल यांचा ताफा इंफाळला पोहोचला. दरम्यान, इंफाळ जवळच्या राहुल गांधी यांचा ताफा रोखण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं. राहुल गांधी यांचा ताफा का रोखण्यात आला…

मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. हा हिंसाचार रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जाता आहेत. मणिपूरमध्ये 3 मे रोजी या जातीय दंगलींची ठिणगी पडली होती. मणिपूरच्या परिस्थितीवर गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच सर्वदलीय बैठक बोलावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी मणिपूर दौरा करण्याचे ठरवले. दंगली उसळल्यानंतर काँग्रेस नेत्यांचा हा पहिलाच दौरा आहे.

Rahul Gandhi Visit to Manipur : राहुल गांधी दोन दिवसीय मणिपूर दौऱ्यावर

राहुल गांधी आज आणि उद्या 29-30 जून रोजी मणिपूरमध्ये असतील. यादरम्यान ते मदत छावण्यांना भेट देणार आहेत. ते इम्फाळ आणि चुरचंदपूर येथील नागरी समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील. ते मदत छावण्यांनाही भेट देणार आहेत, अशी माहिती एएनआयने ट्वीट करून दिली होती.

नियोजनानुसार राहुल गांधी गुरुवारी इंफाळला पोहोचले आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांचा ताफा रोखण्यात आल्याचे वृत्त आहे. अमर उजालाच्या वृत्तानुसार इंफाळपासून काही अंतरावर असलेल्या विष्णुपूर जिल्ह्यात राहुल गांधी यांचा ताफा अडवण्यात आला. पोलिसांनी अशांती असल्याचे कारण पुढे करत हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, पोलिसांनी सांगितले की ते नेत्यांना पुढे जाऊ देण्याच्या “स्थितीत” नाहीत. “राहुल गांधींच्या ताफ्याला पोलिसांनी बिष्णुपूरजवळ अडवले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की ते आम्हाला परवानगी देण्याच्या स्थितीत नाहीत. लोक राहुल गांधींना ओवाळण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत. आम्हाला हे समजत नाही त्यांनी आम्हाला का अडवले आहे,” असे वेणुगोपाल यांनी एएनआयला सांगितले.

राहुल गांधी यांचा ताफा रोखल्यानंतर काही वेळाने ते पुन्हा इंफाळला परतले, अशी माहिती एएनआयने ट्विट करून दिली आहे.

राज्यातील सध्याच्या परिस्थितीसाठी काँग्रेसने भाजप आणि त्यांच्या ‘विभाजनाच्या राजकारणाला’ जबाबदार धरले आहे. याशिवाय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ तेथे पाठवले पाहिजे.

हे ही वाचा :

Rahul Gandhi : राहुल गांधी आजपासून मणिपूर दौर्‍यावर, हिंसाचारग्रस्‍त भागात देणार भेट

राहुल गांधींच्या विरोधात ट्विट; भाजपचे IT Cell प्रमुख अमित मालवीय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Back to top button