कर्नाटकात निम्मे तांदूळ, निम्म्या तांदळाचे पैसे; तांदूळ टंचाईवर मंत्रिमंडळ निर्णय | पुढारी

कर्नाटकात निम्मे तांदूळ, निम्म्या तांदळाचे पैसे; तांदूळ टंचाईवर मंत्रिमंडळ निर्णय

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्य सरकारकडून अन्नभाग्य योजना राबविण्यात येणार असून, आता 10 किलोमध्ये प्रति व्यक्ती निम्मे तांदूळ, तर निम्म्या तांदळाचे पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला. 5 किलो तांदूळ व 5 किलो तांदळाचे प्रती किलो 34 रु. दराने प्रतिमहिना 170 रुपये प्रत्येक व्यक्तीला देण्यात येणार आहेत. योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.

मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी झाली. यामध्ये अन्नभाग्य योजनेबाबत चर्चा करण्यात आली. केंद्राने तांदूळ देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर निम्मा तांदूळ पुरवण्याबरोबरच निम्म्या तांदळाचे पैसे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. लाभार्थ्याच्या बँक खात्यात हे पैसे थेट जमा करण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना म्हणाले,  बीपीएल शिधापत्रिकाधारकांना सध्या देण्यात येणार्‍या 5 किलो तांदळाचे मोफत वाटप सुरूच राहणार आहे. निवडणूक काळात काँग्रेसने दहा किलो तांदूळ देण्याचे जाहीर केले होते. मात्र तांदूळ उपलब्ध नसल्याने एफसीआयने निश्चित केलेल्या दरानुसार लाभार्थ्यांना पाच किलो तांदळाची रक्कम देण्यात येईल. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने राज्यातील जनतेला दिलेली आश्वासनांची पूर्तता करण्याबाबत आमची बांधिलकी आहे. सध्या केंद्र सरकार बीपीएल शिधापत्रिकाधारक प्रत्येक व्यक्तीला पाच किलो मोफत देत आहे. आम्ही दहा किलो देण्याचे जाहीर केले होते. यासाठी तांदळाची मागणी केंद्राकडे केली होती. परंतु तांदूळ उपलब्ध नसल्याची माहिती केंद्राने दिली आहे. केंद्र सरकार राजकारण करत आहे.

अतिरिक्त 5 किलो तांदूळ वितरणासाठी 135 लाख टन तांदळाची गरज आहे. केंद्राकडे 2.62 लाख मेट्रिक टन तांदळाचा साठा आहे. केंद्राने तांदूळ देण्यास असमर्थतता दर्शविली आहे. हाच तांदूळ खासगी व्यक्तींना 31 रु. दराने विकण्यात येत आहे. हे राजकारण सुरू आहे. खुल्या बाजारात खरेदीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु यासाठी निविदा मागवावी लागणार आहे. प्रक्रिया पूर्ण करण्यास उशीर होतो. त्यामुळे तांदूळ उपलब्ध होईपर्यंत लाभार्थ्यांना पैसे दिले जातील, असे सांगण्यात आले.

2 लाख 29 हजार टन आवश्यक

राज्यातील बीपीएल आणि एपीएल शिधापत्रिकाधारकांना राज्य सरकारकडून तांदूळ पुरवण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक महिन्याला 2 लाख 29 हजार टन तांदळाची आवश्यकता आहे. इतक्या प्रमाणात तांदळाचा पुरवठा करण्याची कोणत्याही राज्याची क्षमता नाही. बाजारात तांदळाचे दरही वाढल्याने अडचण निर्माण झाली आहे.

Back to top button