मनाली-चंदीगड महामार्ग १८ तासांनंतरही ठप्‍पच, हजारो पर्यटक ‘बेहाल’ | पुढारी

मनाली-चंदीगड महामार्ग १८ तासांनंतरही ठप्‍पच, हजारो पर्यटक 'बेहाल'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मनाली- चंदीगड महामार्ग ( Manali- Chandigarh Highway ) १८ तासांनंतरही ठप्‍पच आहे. त्‍यामुळे हजारो वाहनांसह पर्यटक अडकून पडले आहेत. पांडोह मंडी आणि नचगला येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रविवारी रात्री उपाशी पोटी राहावे लागल्‍याने हजाराे पर्यटकांचे अतोनात हाल झाले. प्रतिकूल हवामानामुळे रात्री ढिगारा हटवण्याचे काम पूर्ण झाले नाही. आज पुन्‍हा ‘एनएचएआय’ने ढिगारा उपसण्‍याचे काम सुरु केले आहे. हवामान सुरळीत झाल्यास दुपारपर्यंत रस्ता पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.
Chandigarh-Manali highway : हजारो पर्यटकांचे अतोनात हाल

मनाली- चंदीगड महामार्ग बंद झाल्याने हजारो वाहने आणि पर्यटक अडकून पडले आहेत. पांडोह, मंडी आणि नचगला येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पंडोह, नागचाळा आणि मंडई येथे मालवाहू वाहने आणि लक्झरी बसेस थांबवण्यात आल्या आहेत. अवजड वाहने वगळता अन्‍य वाहने दादौर, बग्गी, चौलचौक, गोहरमार्गे पांडोहला पाठवली जात आहेत. येथून वाहने पुन्हा कुल्लू मनालीकडे रवाना होत आहेत. कुल्लू मनालीकडून येणारी हलकी वाहने या पर्यायी मार्गाने दादौरला पाठवली जात आहेत. मात्र तेथेही वाहतूक कोंडी कायम असल्‍याने वाहनचालकांचे हाल होत आहेत.

पाऊस आणि दरड कोसळल्याने मंडी जिल्ह्यातील ११२ रस्ते ठप्प झाले आहेत. २०० हून अधिक वीज ट्रान्सफॉर्मर बाधित झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रस्ता बंद झाल्यामुळे कुल्लू, मनाली आणि मंडी जिल्ह्यांतील अनेक भागात सोमवारी दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होऊ शकला नाही, अशी माहिती मंडीचे उपायुक्त अरिंदम चौधरी यांनी दिली. मनाली चंदिगड राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी लवकरच पूर्ववत होण्याची अपेक्षा असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा :   

 

 

Back to top button