Patna Opposition Meeting: सत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीसाठी विरोधकांची पाटण्यात ‘महापंचायत’; राज्यनिहाय रणनीती आखण्याची बैठकीत चर्चा | पुढारी

Patna Opposition Meeting: सत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीसाठी विरोधकांची पाटण्यात 'महापंचायत'; राज्यनिहाय रणनीती आखण्याची बैठकीत चर्चा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यायाने सत्ताधाऱ्यांसोबत दोन हात करण्याकरीता आज (दि.२३) बिहारची राजधानी पाटण्यात विरोधी पक्षांनी एकजुटीची वज्रमुठ बांधण्यासाठी ‘महापंचायत’  (Patna Opposition Meeting) भरवली. या महाबैठकीत आगामी निवडणूक एकत्रित लढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला असून, जागावाटपाचा फार्म्युला लवकरच निश्चित केला जाईल. भाजपला रोखण्यासाठी प्रत्येक राज्यनिहाय रणनीती आखण्यावर बैठकीत चर्चा झाली असून त्यासंबंधी सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

विरोधकांना (Patna Opposition Meeting) एकत्रित निवडणूक लढवण्यासाठी एक ‘कॉमन अजेंडा’ तयार केला जात आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात शिमल्यात विरोधकांची दुसरी बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा करीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.कुणी कुठून निवडणूक लढवायची, किती जागा लढवायचा यासंदर्भात पुढील महिन्यात निर्णय घेतला जाईल असे बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेतून विरोधकांनी स्पष्ट करण्यात आले.

बैठक आयोजित करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारासह १५ विरोधी पक्षाचे महत्वाचे नेते बैठकीत प्रामुख्याने उपस्थित होते.

आप-कॉंग्रेसमधील मतभेद दूर होणार !

महाबैठकीतून कॉंग्रेस आणि आप मधील मतभेत दूर करण्यासाठी एनसीपी प्रमुख शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला. एकत्रित येवून आपसी मतभेद विसरावे लागतील, असे मत उभय नेत्यांनी व्यक्त केला. दरम्यान पवारांनी एनसीपी आणि शिवसेनेचे उदाहरण दिले. गत २५ वर्षांपासून एकदुसर्यांवर आरोप केल्यानंतर देखील प्रत्येक मतभेद बाजूला ठेवून एकत्रित काम करीत असल्याचे पवार म्हणाले.आता मतभेद विसरून एकत्रित काम करण्याची वेळ आली असल्याचे ठाकरे म्हणाल्याचे कळतेय.

Patna Opposition Meeting: …तर भाजपला फायदा

पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसच्या भूमिकेवर ममता बनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारविरोधात कॉंग्रेसच्या धरणे आंदोलनावर त्यांनी आक्षेप घेतला. सर्वांना मोठे मन दाखवावे लागेल. आपसात लढलो तर भाजपला याचा फायदा होईल, असे मत बॅनर्जी यांनी व्यक्त केले.

केंद्राच्या वटहुकूमावर आपला समर्थन देण्याची कॉंग्रेसला आवाहन

बैठकीतून सर्व नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.आप संयोजन केजरीवाल यांनी दिल्लीच्या वटहुकूमावर सर्वांचे समर्थन मागितले. उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांना कॉंग्रेसला वटहुकूमावर समर्थन देण्याची विनंती केली.पंरतु, नॅशनल कॉंग्रेसचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी अनुच्छेद ३७० संदर्भात केजरीवाल यांनी स्पष्ट भूमिका न घेतल्याची आठवण करून दिली. बैठकीत किमान समान कार्यक्रम तयार करण्यावर चर्चा करण्यात आली.विरोधी आघाडीसाठी एक संयोजक बनवण्याच्या आवश्यकतेवर बैठकीत भर देण्यात आला.

Patna Opposition Meeting : विरोधकांची एकजूट महत्वाची

विरोधी पक्षाची एकजुट महत्वाची आहे.स्वच्छ मनाने विरोधकांनी एकत्रित यावे. समोरासमोर थेट चर्चा व्हावी. आत काही एक आणि बाहेर काही एक असे व्हायला नको, असे राहुल म्हणाले.

Patna Opposition Meeting: बैठकीत २७ नेत्यांची हजेरी

विरोधकांच्या बैठकीत १५ पक्षाचे २७ नेते सहभागी झाले होते. शिवसेना उबाठा पक्षाचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पवार, कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के.सी.वेणुगोपाल, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, भगवंत मान,राघव चढ्ढा, संजय सिंह, तृणमुल कॉंग्रेसच्या ममता बनर्जी, अभिषेक बनर्जी, डेरेक ओब्रायन, फिरहाद हकीम, झामुमोचे हेमंत सारेन, राजद लालु प्रसाद यादव, तेजस्वी यादव, मनोज झा, डीएमके एक.के.स्टॅलिन, टीआर बालू, जेडीयू नितीश कुमार, ललन सिंह, सपा चे अखिलेश यादव, सीताराम येचूरी सीपीआयएम, उमर अब्दुल्ला नॅका,महबुबा मुफ्ती पीडीपी, दीपंकर भट्टाचार्य सीपीआयएमएल आणि डी राजा (सीपीआय) सहभागी झाले होते.

एकत्रित निवडणूक लढवण्यावर बैठकीत संमती झाली.पुढील महिन्यात होणार्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल.सर्व पक्षांनी बैठकीतून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता कोण कुठून लढणार याचा निर्णय घेवू. देशहितासाठी काम न करणार्या सरकारविरोधात ही लढाई आहे.

– नितीश कुमार, मुख्यमंत्री, बिहार.

प्रत्येक राज्यात वेगवेगळी व्युहरचना आखवी लागेल. तामिळनाडू, बिहार, काश्मीर, महाराष्ट्रात काय करायला हवे, या अनुषंगाने राज्यनिहाय रणनीती आखली जाईल. भाजपला सत्तेतून बेदखल करण्यासाठी २०२४ ची निवडणूक एकत्रित लढणार. कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंतचे नेते बैठकीत उपस्थित होते. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ज्या राज्यातून गेली त्या जवळपास सर्वच राज्यातील नेते बैठकीत उपस्थित होते. शिमल्यातील बैठकीत अंजेडा तयार केला जाईल.

– मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, कॉंग्रेस.

हिंदुस्तानच्या नियतीवर, पायव्यावर, संस्थांवर तसेच आवाजावर भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हल्ले करीत आहे. विचारधारेच्या या लढाईत सर्व एकत्रित येत एकजुटीने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. एकत्रित काम करतांना लवचिकतेने काम करावे लागेल.विचारधारेचे संरक्षण करावे लागेल. विरोधी एकतेची ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेनूसार पुढील वाटचाल केली जाईल.

– राहुल गांधी, कॉंग्रेस नेते

पाटण्यातून सुरू होणारे प्रत्येक आंदोलन जनआंदोलनाचे स्वरुप घेते. अनेक आंदोलन पाटण्यातून सुरू झाली. आम्ही एक आहोत, आम्ही एकत्रित लढू असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. भाजपचे हुकूमशाही सरकार राजभवनातून पर्यायी सरकार चालवत आहे. मनमर्जी प्रमाणे काम करीत आहे. विरोधात बोलणार्यांवर ईडी कारवाई करीत आहे. पुन्हा भाजप सत्तेत आले तर निवडणुकाच होणार नाही. त्यामुळे आता इतिहास बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला धडा शिकवू.दिल्लीसंदर्भात केंद्राने आलेल्या वटहुकूमाविरोधात सर्वांनी साथ द्यावी.

– ममता बनर्जी, मुख्यमंत्री,पश्चिम बंगाल

कॉंग्रेस सत्तेत नसलेल्या ठिकाणी भाजप, आरएसएस सांप्रदायिक स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे.अशात समाज एक होवू नये असा भाजप प्रयत्न करीत आहे. त्याचा सामना करण्यासाठी, व्यापक देशहितासाठी, आपापसातील मतभेद, समस्या दूर सारत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. पाटण्यात जी सुरूवात झाली आहे ती देशात बदल आणण्याची सुरूवात आहे. या नवीन मार्गाचे देशातील जनता स्वागत करेल.

शरद पवार, अध्यक्ष, एनसीपी

देशाची लोकशाही, घटनेवर हल्ले केले जात आहे. जम्मू-काश्मिरमधून याची सुरूवात करण्यात आली. जम्मू-काश्मिरने गांधी-जवाहरलाल नेहरु यांच्या देशासोबत हात मिळवणी केली होती. गंगा-यमुना संस्कृतीत समाविष्ट झालो होतो. पंरतु, सध्यस्थितीत देशातील अल्पसंख्यकांसोबत दुजाभाव केला जात आहे. या वातावरणात गांधीजींच्या देशाला गोडसेचा देश न बनू देण्यासाठी आम्ही सर्व एकत्रित आलो आहोत.

मेहबुबा मुफ्ती, पीडीपी

एकत्रित आलेले सर्व वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत. त्यांची विचारधारा वेगवेगळी आहे. मतभिन्नता असून शकते. पंरतु, देशाला वाचवण्यासाठी, अखंडता कायम ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. देशाच्या लोकशाहीवर आघात करणाऱ्यांचा विरोध करणार आहोत. आम्ही स्वत:ला विरोधक मानत नाही, तर देशात हुकूमशाही आणऱ्यांविरोधात सदैव राहू.

उद्धव ठाकरे,  पक्षप्रमुख, शिवसेना (उबाठा)

विविधतेत एकता ही प्रतिमा गेल्या अनेक शतकांपासून भारताची राहीली आहे. पंरतु, आता या एकतेत दरी निर्माण झाली आहे. ही दरी भरून करण्याचे काम करावे लागणार आहे. वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्रित आले आहेत.वर्तमान परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अनुषंगाने, पीडित, शोषितांना संरक्षण देण्यासाठी एकत्रित यावे लागेल. या अनुषंगाने ही बैठक आयोजित केली होती.

हेमंत सोरेन, मुख्यमंत्री, झारखंड.

धर्मनिरपेक्ष संघराज्य असे देशाचे चरित्र आहे.पंरतु, सत्ताधारी देशाचे चरित्र बदलण्याचे काम करीत आहे. संपूर्ण घटनेच्या स्तंभावर हल्ला केला जात आहे. संघराज्यावर हल्ले केले जात आहे. यातून देशाला वाचवण्यासाठी राजकीय बैठका, आंदोलने केली जातील. मतांचे विभाजन टाळण्यासाठी चर्चा केली जाईल.

सीताराम येचुरी, सीपीआय

Patna Opposition Meeting : लालूप्रसाद यादवांची टोलेबाजी

प्रकृती अवस्थेनंतर बऱ्याच दिवसांनी सार्वजनिक बैठकीत लालू प्रसाद यादव दिसून आले.’आता बरा झालो आहे, भाजपला बरं करायचे आहे’, असा टोला यावेळी यादवांनी लगावला. हनुमानाचे नाव घेवून निवडणूक लढणाऱ्या भाजपला कर्नाटकने साथ दिली नाही. हनुमान त्यांच्यावर नाराज आहे. ते आता आमच्या सोबत आहेत, अशी प्रतिक्रिया लालू यादव यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी लग्न करावे आम्ही वराडी बनून येवू, अशी मिश्किल मागणीही त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली. राहुल यांनी भारत जोडो यात्रा करीत चांगले काम केले. अदानी प्रकरणात त्यांनी लोकसभेतही चांगले काम केल्याचे लालू यादव पत्रकार परिषदेतून म्हणाले.
हेही वाचा 
 

Back to top button