अन्नभाग्य योजना : कर्नाटकला छत्तीसगडचा तांदूळ | पुढारी

अन्नभाग्य योजना : कर्नाटकला छत्तीसगडचा तांदूळ

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्य सरकारच्या अन्नभाग्य योजनेसाठी तांदूळ देण्यास केंद्राने नकार दिला आहे. त्यामुळे सरकारकडून इतर राज्यातून तांदूळ खरेदी करण्यासाठी योजना आखण्यात येत आहे. छत्तीसगड राज्यातून 1.5 लाख टन तांदूळ पुरवठा होणार आहे. याबाबत आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

बंगळूर येथे शनिवारी (दि. 17 रोजी) पत्रकरांशी ते बोलत होते. छत्तीसगड राज्यातून मिळणार्‍या तांदळचा दर जास्त आहे. यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सरकार कमिशनसाठी परराज्यातून तांदूळ खरेदी करत असल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत. मात्र, राज्यात तांदूळसाठा उपलब्ध आहे का, असा प्रश्न मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला.
छत्तीसगड सरकारने कर्नाटक सरकारला तांदूळ पुरवठा करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता अन्नभाग्य योजना राबविण्यात समस्या निर्माण होणार नाहीत. यासंदर्भात राज्यातील अधिकार्‍यांचे पथक छत्तीसगड सरकारच्या संपर्कात आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री सांगितले.

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी अन्नभाग्य योजना 1 जुलैपासून सुरू करण्याची घोषणा राज्य सरकराने केली आहे. यासाठी लागणारा तांदूळ पुरवठा केंद्र सरकारकडून मिळणार होता. मात्र, अचानक अन्न पुरवठा महामंडळाने नकार दर्शविल्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात कलगीतुरा निर्माण झाला. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.

1 जुलैपासून अन्नभाग्य योजनेंतर्गत सरकाने 10 किलो तांदूळ पुरवठा न राबविल्यास भाजपने राज्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, आता छत्तीसगड राज्याने तांदूळ पुरवठा करण्यास हिरवा कंदील दर्शविल्याने राज्य सरकारला थोडा दिलासा मिळाला असून इतर राज्यांकडून तांदूळ मिळविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

Back to top button