बेळगावात लघुद्योग हब; एकूण आठ जिल्ह्यांत नियोजन | पुढारी

बेळगावात लघुद्योग हब; एकूण आठ जिल्ह्यांत नियोजन

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  बेळगावसह आठ जिल्ह्यांत औद्योगिक हब उभारण्याचे नियोजन आहे, अशी माहिती लघुद्योग मंत्री शरणबसाप्पा दर्शनापूर यांनी बुधवारी दिली. मुख्यमंत्री सिध्दरामय्या येत्या शनिवारी 17 रोजी अर्थसंकल्पासंदर्भात बैठक घेणार आहेत. या बैठकीत लघुद्योग खात्यासाठी 700 कोटींचा निधी द्यावा, असा प्रस्ताव मांडणार असल्याचही त्यांनी सांगितले.

विधानसौधमध्ये मंत्री पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कोरोनामुळे लघुद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी लघुद्योजकांशी लवकरच बैठक घेऊन चर्चा करु. तसेच बेळगाव, चित्रदुर्ग, हुबळी, बिदर, विजापूर यासह 8 जिल्ह्यांत लघुद्योग वसाहती स्थापन करण्यात येणार आहेत. प्रत्येक वसाहतीसाठी 50 ते 100 एकर जमीन आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यात उद्योग खात्याची 15 ते 20 एकर जमीन आहे. उर्वरित जमीन खरेदी किंवा भाडेतत्वावर संपादित केली जाईल. बळ्ळारीत 100 एकर जागेत औद्योगिक वसाहत आहे. मात्र तिथे पा÷ण्याची समस्या असल्याने उद्योजक उद्योग उभारण्यास तयार नाहीत. त्या वसाहतीला लवकरच सुविधा दिल्या जातील, असेही मंत्र्यांनी सांगितले.  त्याशिवाय एक हजार एकरची लघुद्योग वसाहतही आहे. त्या वसाहतीत उद्योग उभारण्यासाठी आता पाचशे उद्योजक पुढे आले आहेत. त्यांनाही सुविधा पुरवू, असे मंत्री म्हणाले.

बेळगावात सध्या उद्यमबाग, मच्छे आणि होनगा अशा तीन मुख्य औद्योगिक वसाहती आहेत. तर ऑटोनगरला एक लघुद्योग वसाहत आहे. नवी लघुद्योग वसाहत कुठे उभारली जाणार, याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.

बेळगाव नंबर 2

फौंड्री हे बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राचे वैशिष्ट्य. बंगळूरनंतर सर्वाधिक महसूल बेळगाव जिल्ह्यातून मिळतो. बेळगावातून जर्मनीसह अनेक देशांना सुट्या भागांची निर्यातही केली जाते. इतके असूनही बेळगावच्या औद्योगिक वसाहतींना पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. नव्या लघुद्योग वसाहतीत तरी या सुविधा सुरुवातीपासूनच मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे.

वीज दरवाढीबाबत विचार

लघुद्योजकांना वीज दरवाढीच्या चिंतेने घेरले आहे. राज्यभरातील उद्योजकांनी तक्रारी केल्या आहेत. गुलबर्गा लघुद्योजक संघटनेने निवेदनही पाठवले आहे. त्यामुळे वीजदर वाढीसह इत समस्यांबाबतही लवकरच उद्योजकांशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही मंत्री दर्शनापूर यांनी दिली.

Back to top button