पश्चिम बंगालमध्ये उफाळला हिंसाचार | पुढारी

पश्चिम बंगालमध्ये उफाळला हिंसाचार

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये 8 जुलै रोजी होणार्‍या पंचायत निवडणुकीपूर्वी सातत्याने हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. बुधवारी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील कॅनिनमध्ये उमेदवारी अर्ज भरताना सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांत धुमश्चक्री झाली. दोन्ही गटांकडून एकमेकांवर बॉम्बफेक करण्यात आली.

पक्षाचे विभागप्रमुख  सॅबल लाहिरी यांच्या नेतृत्वाखाल तृणमूलच्या कार्यकर्त्यांना कॅनिंग बसस्थानकानजीक रस्ता जाम केला. गटविकास अधिकार्‍यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुसर्‍या गटाने अडविले असल्याचा आरोप तृणमूलच्या लाहिरी गटाने केला. दुसरा गट तृणमूलचे आमदार परेश राम यांचा निकटवर्तीय मानला जातो. दुसरीकडे बांकुडा जिल्ह्यात चौकशीवेळी पोलिसांना एका मोटारीत बॅग सापडली. यामध्ये डझनभर बॉम्ब सापडले. पोलिसांनी मोटार जप्त केली असून 8 जणांना अटक केली आहे. पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजून दोन दिवस बाकी आहेत. मंगळवारी कोलकाता हायकोर्टात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यासाठी सुनावणी झाली. तारीख वाढवण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घ्यावा, असे निर्णय कोर्टाने दिला होता.

Back to top button