Senthil Balaji arrest | तामिळनाडूत मंत्री बालाजींच्या ईडी अटकेनंतर हायव्होल्टेज ड्रामा! वाचा नेमकं काय घडलं? | पुढारी

Senthil Balaji arrest | तामिळनाडूत मंत्री बालाजींच्या ईडी अटकेनंतर हायव्होल्टेज ड्रामा! वाचा नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन : मनी लाँड्रिंग प्रकरणी डीएमके नेते आणि तामिळनाडू सरकारमधील वीज आणि अबकारी खात्याचे मंत्री सेंथिल बालाजी (State minister Senthil Balaji) यांच्या ठिकाणांवर ईडीने छापेमारी करत त्यांनी रात्री उशिरा अटक केली होती. तब्बल १८ तास त्यांची चौकशी केल्यानंतर ईडीने सेंथिल यांना अटक केली. या कारवाईदरम्यान सेंथिल बालाजी यांनी त्यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सेंथिल बालाजी यांची आज सकाळी कोरोनरी अँजिओग्राम चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना लवकरात लवकर बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला चेन्नईतील तामिळनाडू सरकारी मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने दिला आहे. (Senthil Balaji arrest)

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Tamil Nadu CM MK Stalin) यांनी बुधवारी चेन्नईतील ओमंदुरार सरकारी रुग्णालयात जाऊन सेंथिल बालाजी यांच्या तब्येतीची विचारपूस केली. ईडीच्या चौकशीदरम्यान छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर बालाजी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

स्टॅलिन जेव्हा बालाजी यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, तेव्हा अनेक डीएमके कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर राज्यपाल आरएन रवी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन जारी करत म्हटले आहे की डीएमके भाजपच्या धमक्यांना घाबरत नाही आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लोक भाजपला धडा शिकवतील. सेंथिल बालाजी आणि डीएमके दोघेही मोठ्या हिमतीने या प्रकरणी कायदेशीररित्या लढा देतील, असेही त्यांनी सांगितले.

स्टॅलिन यांनी आरोप केला आहे की ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीदरम्यान सेंथिल बालाजी यांचा इतका छळ केला की त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांनी तपास अधिकार्‍यांना सहकार्य करत असल्याचे सांगितल्यानंतरही त्यांच्यावर दबाव घालण्यात आला होता. परिणामी ताणतणाव वाढून त्यांच्या छातीत दुखू लागल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. बालाजी यांच्याशी संबंधित ठिकाणांवरील आवारात छापे टाकल्यानंतर ईडीने बालाजी यांना ताब्यात घेतल्याच्या काही तासांनंतर स्टॅलिन यांनी हे विधान जारी केले आहे. (Senthil Balaji arrest)

बालाजी यांच्यावर ईडीने दबाव आणला आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा छळ केला होता, असे स्टॅलिन यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. “त्याच्यावर दबाव आणला. पहाटे २ पर्यंत त्यांच्यावर दबाव आणला आणि नंतर त्यांना रुग्णालयात नेले. आता ते आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. त्यांनी तपासात पूर्ण सहकार्य करू, असे सांगूनही त्यांचा छळ करण्याचा उद्देश काय?. या प्रकरणात त्यांनी अतिशय अमानुषपणे वर्तन केले आहे. ज्यांनी या अधिकाऱ्यांना पाठवले त्यांचे वाईट हेतू आम्हाला स्पष्टपणे दिसत आहेत. सेंथिल बालाजी कायदेशीर लढा देतील. आम्ही या प्रकरणावर आमच्या राजकीय भूमिकेवर ठाम आहोत.” असे स्टॅलिन यांनी निवेदनात म्हटले आहे.

बालाजी ओक्साबोक्सी रडले

दरम्यान, द्रमुक सरकारमधील मंत्र्यांना सकाळी उपचारासाठी आणण्यात आल्यानंतर रुग्णालयाबाहेर प्रचंड गोंधळ उडाला होता. ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी त्यांचे समर्थक रुग्णालयाबाहेर जमले असताना सेंथिल बालाजी कारमधून बाहेर पडताना ओक्साबोक्सी रडताना दिसले. दरम्यान, चेन्नईतील ओमंदुरार सरकारी रुग्णालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

कोण आहेत सेंथिल बालाजी?

४७ वर्षीय सेंथिल बालाजी यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांच्याकडे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळात वीज आणि अबकारी खात्याची जबाबदारी आहे. चार वेळा आमदार राहिलेल्या सेंथिल यांनी पहिल्यांदा २००६ मध्ये AIADMK च्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ते २०११ ते २०१५ दरम्यान माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या मंत्रिमंडळातही त्यांचा सहभाग होता. तीन वर्षांनंतर ते द्रमुकमध्ये दाखल झाले.

आयकर (आयटी) विभागाने शुक्रवारी चेन्नई आणि कोईम्बतूरमधील डीएमके मंत्री सेंथिल बालाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ४० मालमत्तांवर छापे टाकले, तेव्हा त्यांना सेंथिल समर्थकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. यावेळी वाहनांवर हल्ले करण्यात आले. यामुळे काही ठिकाणी अधिकाऱ्यांना छापेमारी रद्द करण्याची वेळ आली होती.

नेमकं काय आहे प्रकरण?

हे प्रकरण राज्याच्या परिवहन विभागातील जॉब फॉर कॅश घोटाळ्याशी संबंधित आहे, जो बालाजी यांच्या AIADMK सरकारच्या कार्यकाळात परिवहन मंत्री म्हणून असताना २०११-१६ दरम्यान घडला होता. मार्च २०२१ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी चेन्नई पोलिसांनी बालाजी आणि इतर ४६ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. ज्यात विविध परिवहन महामंडळांचे वरिष्ठ सेवानिवृत्त आणि सेवारत अधिकाऱ्यांच्या समावेश होता.

हे ही वाचा :

Back to top button