जुलैपासून सर्वोच्च न्यायालय होणार पेपरलेस | पुढारी

जुलैपासून सर्वोच्च न्यायालय होणार पेपरलेस

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : येत्या ३ जुलैपासून सर्वोच्च न्यायालय पेपरलेस होणार असून न्यायमूर्ती आणि वकिलांसाठी नवीन सुविधा उपलब्ध होणार आहेत. न्यायमूर्तीसाठी खास पॉपअप स्क्रीन, ज्यावर कागदपत्रांऐवजी ते सारे डिजिटल स्वरूपात दिसेल; तर वकिलांनाही डॉक्युमेंट रीडरसारखी साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

उन्हाळी सुट्ट्यांनंतर ३ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू होईल तेव्हा १, २ आणि ३ क्रमांकाच्या कोर्ट हॉलचे नवे रूप सर्वांना बघायला मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पेपरलेस व्हावे यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पातून काही बदल करण्यात आले आहेत. आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून होणाऱ्या सुनावणीसाठी न्यायमूर्तीसमोर १२० इंची टीव्ही असणार आहे. त्याशिवाय न्यायमूर्तीसमोर सुनावणी सुरू असताना कागद नसतील. ती सारी कागदपत्रे त्यांना समोरच्या पॉपअप स्क्रीनवर वाचता येतील. तसेच डॉक्युमेंट व्ह्यूअर तंत्रज्ञानही उपलब्ध असणार आहे. त्यातून संबंधित कागद त्या यंत्रावर ठेवल्यास त्यावरील मजकूर पडद्यावर वाचता येईल.

हे कागद युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनाही त्यांच्यासमोरच्या स्क्रीनवर वाचता येईल. वकिलांनाही त्यांच्याकडील कागदपत्रे व फायली वाचण्यासाठी स्मार्ट स्क्रीन उपलब्ध असतील. त्या शिवाय युक्तिवादादरम्यान वकिलांना लागणारी कायदेविषयक पुस्तके ढिगाने आणण्याची गरज राहणार नाही. त्यासाठी खास डिजिटल लायब्ररी तयार करण्यात आली असून एका क्लिकवर ही माहिती कोर्टरूममध्येच उपलब्ध होणार आहे. कोणते जुने निकाल संदर्भासाठी लागणार आहेत याची माहिती सुनावणीआधी वकिलांनी कर्मचाऱ्यांकडे दिल्यावर ती सर्च करून योग्य तो भाग डिजिटली उपलब्ध केला जाणार आहे. तो एकाच वेळी वकील आणि न्यायमूर्तीसमोरील स्क्रीनवर दिसू शकेल.

फर्निचर बदलले, पंखेही बदलले

न्यायालयीन कामकाज सुटसुटीत आणि गतिमान होण्यासाठी आवश्यक असलेले आणखी बदल आगामी काळात केले जाणार आहेत. न्यायालयाच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर होत असताना कोर्ट रूममध्येही बदल करण्यात येत आहेत. जुने फर्निचर बदलून नवीन सुटसुटीत फर्निचर वापरले जाणार आहे, तसेच जुने अवाढव्य आकाराचे पंखेही हटवण्यात आले असून त्या जागी नवीन पंखे बसवण्यात येत आहेत.

सारी यंत्रणा भारतातच विकसित

ही सर्व यंत्रणा भारतातच विकसित करण्यात आली आहे. प्रारंभी तीन कोर्टरूममध्ये असणारी ही व्यवस्था आगामी काळात सर्वच कोर्टरूम्समध्ये उपलब्ध केली जाणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायालयाचे कामकाज तंत्रज्ञानस्नेही असावे यासाठी कामकाज डिजिटल अर्थात पेपरलेस करण्यावर त्यांचा भर आहे.

Back to top button