भाडेकरूंनाही मिळणार मोफत वीज : मुख्यमंत्री सिद्धरामय्या | पुढारी

भाडेकरूंनाही मिळणार मोफत वीज : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने जारी केलेल्या गृहज्योती योजनेचा लाभ भाडेकरूंनाही मिळणार आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. परिणामी, गृहज्योती योजनेच्या लाभाबाबत निर्माण झालेला गोंधळ संपुष्टात आला आहे. 200 युनिटपर्यंत वीज सर्वांनाच मोफत मिळणार आहे.

राज्य सरकारने गृहज्योती योजनेबाबत अधिकृत घोषणा रविवारी केली होती. गृहज्योतीचा लाभ भाडेकरूंना मिळणार नाही, अशी माहिती दिली होती. यामुळे भाडेकरूंमध्ये नाराजी पसरली होती. त्याचबरोबर राज्यातील विरोधी पक्ष असणार्‍या भाजपने यावर टीकेची झोड उठवली होती. याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी खुलासा केला.

विधानसौधमध्ये मंगळवारी देवराज अर्स यांचा 41 वा पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमानंतर ते पत्रकारांबरोबर बोलत होते. ते म्हणाले, सरकारकडून गृहज्योतीच्या माध्यमातून पुरवण्यात येणारी 200 युनिटपर्यंतची मोफत वीज केवळ घरगुती वापरासाठीच येणार आहे. त्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करता येणार नाही. मात्र, भाडेकरूंना 200 युनिट वीज मोफत असेल. उर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले, घरमालकाने किती भाड्याची घरे आहेत, ही माहिती देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे घरमालकाने सर्व प्रकारचे कर भरलेले असले पाहिजेत. आपल्याजवळ इतकी भाड्याची घरे असून त्याचा इतका कर भरलेला आहे, अशी माहिती घरमालकांनी द्यावी लागणार आहे. चुकीची माहिती देणार्‍यांना योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. त्याचबरोबर भाड्याच्या घरात राहणार्‍या व्यक्तींनीही आपण इतक्या वर्षांपासून भाड्याने राहत असून भाडे देत आलो आहे याची माहिती द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर घरभाडे, वीज बिल याबाबत करारपत्र दाखवावे लागणार आहे. भाडेकरुंना 200 युनिटपर्यत वीज देण्यात सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ नसून सर्वानाच त्याचा लाभ देणार असल्याची माहिती जॉर्ज यांनी दिली.

हे करावे लागणार

  • किती घरे भाड्याने दिलेली आहेत, हे घरमालकाने जाहीर करावे.
  • त्या सगळ्या घरांचे सगळ्या प्रकारचे कर भरलेले असावेत.
  • किती वर्षांपासून भाडेकरू राहात आहेत, हे जाहीर करावे.
  • भाडे करारपत्र सादर करावे. भाडे भरल्याची पावती द्यावी.

Back to top button