वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे बेतले जिवावर | पुढारी

वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे बेतले जिवावर

कोईम्बतूर; वृत्तसंस्था :  आपल्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे तामिळनाडूतील एका युवकाच्या जीवावर बेतले आहे. तो आपल्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेला तोच मुळात झिंगलेल्या अवस्थेत. सोबत त्याने तिघा मित्रांनाही नेले होते. घरापाशी गेल्यानंतर त्याने प्रेयसीला साद घातली. मात्र, यावेळी ती बाहेर आली नाही. उलट, तिचा भाऊ विघ्नेश घराबाहेर आला.

प्रशांतला पाहताच विघ्नेशचा पारा चढला. त्यांच्यात सुरुवातीला बाचाबाची झाली. नंतर भांडण हातघाईवर आले. याच गडबडीत विघ्नेशने कोयता उचलला आणि प्रशांतवर वार केला. यात तो गंभीर होऊन कोसळला. त्याला तातडीने इस्पितळात नेण्यात आले. परंतू त्याचा उपयोग झाला नाही. काही वेळातच प्रशांत मरण पावला. तो एका खासगी कंपनीत कामाला होता. मात्र, प्रेयसीच्या घरातील लोकांचा त्याला विरोध होता. तरीसुद्धा तो मागे हटायला तयार नव्हता. तो गांधीनगर येथील रहिवासी होता, तर त्याची प्रेयसी मैलादुमपाराई येथे राहते. आता पोलिसांनी विघ्नेश याला अटक करून त्याच्याकडील कोयता जप्त केला आहे.

Back to top button