Monsoon 2023 Update: मान्सूनचे उद्यापर्यंत केरळमध्ये आगमन; भारतीय हवामान खात्याचा अंदाज | पुढारी

Monsoon 2023 Update: मान्सूनचे उद्यापर्यंत केरळमध्ये आगमन; भारतीय हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: मान्सूनच्या पावसाचे आगमन यंदा अपेक्षेपेक्षा काही दिवसांनी लांबले असून, बुधवारपर्यंत (दि.०७) मान्सून (Monsoon 2023 Update) केरळमध्ये पोहोचू शकतो, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मान्सून पोहोचण्यासाठी अरबी समुद्रात अनुकूल हवामान असले तरी, त्याच्या आगमनाचा याआधीचा अंदाज चुकला आहे.

केरळच्या किनारपट्टीवर 4 जून रोजी मान्सून धडकू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वी वर्तविला होता. मागील दोन वर्षांचा विचार केला तर 2020 साली 1 जून रोजी, 2021 साली 3 जून रोजी तर 2022 साली 29 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, तसेच काळे ढग जमा झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मान्सून (Monsoon 2023 Update) वेगाने केरळच्या किनारपट्टीवर येऊ शकतो, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

Monsoon 2023 Update: देशात उर्वरित भागातही मान्सून लांबणार

दक्षिण अरबी समुद्रात 2.1 किलोमीटर उंचीपर्यंत वेगवान वारे वाहत असल्याने मान्सूनचे आगमन लांबले आहे. केरळमध्ये मान्सून (Monsoon 2023 Update) उशिराने पोहोचणार असल्याने देशाच्या उर्वरित भागातही त्याचे आगमन लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतच्या निश्चित तारखा सांगण्यात आलेल्या नाहीत. पण पुढील दोन ते तीन दिवसांत स्थिती पुरेसी स्पष्ट होईल, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button