Odisha Train Accident : रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; कोरोमंडल अपघातावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांचा हल्लाबोल | पुढारी

Odisha Train Accident : रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; कोरोमंडल अपघातावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : बालासोरच्या रेल्वे दुर्घटनेनंतर राजकारणाला वेग आला असून विरोधकांनी लालबहादूर शास्त्रींचे उदाहरण देत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रेल्वेच्या कारभारावर टीका करीत विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताची चौकशी होणे गरजेचे आहे. लालबहादूर शास्त्री रेल्वेमंत्री असताना दुसरा रेल्वे अपघात झाला होता. त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणत राजीनामा दिला होता. मात्र आज वेगळी परिस्थिती आहे. आत्ताच्या राज्यकर्त्यांना जे योग्य वाटत असेल, ते त्यांनी करावे.

– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

ज्या प्रकारे निष्काळजीपणा दाखवला गेला आणि नागरिकांच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडले गेले, ते पाहता सरकारने रेल्वेचा बट्ट्याबोळ केला आहे. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करायला हवी.
– लालूप्रसाद यादव, माजी रेल्वेमंत्री

रेल्वेमंत्री हे माजी आयएएस अधिकारी आहेत. रेल्वेची यंत्रणा फुलप्रूफ असल्याचा दावा त्यांनी केला होता. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. अर्थात लालबहादूर शास्त्री यांनी जसा राजीनामा दिला तसा मोदी सरकारच्या काळातील मंत्री राजीनामा देतील असे वाटत नाही.
– दिग्विजय सिंग, ज्येष्ठ काँग्रेस नेते

ओडिशाच्या दुर्घटनेमुळे सारा देश शोकाकुल झाला आहे. भाजप नेहमी नैतिकता व सभ्यतेच्या गप्पा करते. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा.
– भूपेश बघेल, मुख्यमंत्री, छत्तीसगड

परिवहन तंत्रज्ञानात एवढ्या घडामोडी असताना अशा दुर्घटनेत शेकडो निष्पाप लोकांचा बळी जाणे हे रेल्वे खात्याचे अपयश आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे.
-अजित पवार, विरोधी पक्षनेते

सरकार केवळ ‘लक्झरी’ ट्रेनवरच लक्ष केंद्रित करीत आहे. सर्वसामान्यांची ट्रेन आणि रेल्वेमार्ग उपेक्षित आहेत. ओडिशातील रेल्वे अपघातात झालेली जीवितहानी यांचाच परिणाम आहे. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
– खा. बिनॉय विश्वम, भारतीय कम्युनिस्ट पार्टी

सरकार विरोधकांची हेरगिरी करण्यासाठी करोडो रुपयांचे सॉफ्टवेअर खरेदी करू शकते. पण अपघातरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यात त्यांना रस नाही. रेल्वेमंत्र्यांना थोडी जरी चाड असेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
– अभिषेक बॅनर्जी, महासचिव तृणमूल कॉंग्रेस

बंगळूर-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस १ जून रोजी सकाळी ७.३० वाजता यशवंतपूर स्थानकावरून निघाली. २ जून रोजी रात्री ८ च्या सुमारास हावडा येथे ती पोहोचणार होती. नियोजित वेळेपेक्षा ३.३० तासांच्या विलंबाने ६.३० वाजता भद्रक येथे ती पोहोचली. पुढचे स्टेशन बालासोर होते.

शालिमार- चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस हावडाहून २ जून रोजी दुपारी ३.२० वाजता निघाली. ३ जून रोजी दुपारी ४.५० वाजता चेन्नई सेंट्रलला पोहोचणे अपेक्षित होते. संध्याकाळी ६.३७ वाजता बालासोरला ती वेळेवर पोहोचली. पुढचे स्टेशन भद्रक येण्याआधी ७ च्या सुमारास बहानागा बाजार स्थानकाजवळ हा अपघात झाला.

Back to top button