Monsoon Update | मान्सूनची वाटचाल संथगतीने! राज्यातील ‘या’ भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा | पुढारी

Monsoon Update | मान्सूनची वाटचाल संथगतीने! राज्यातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

पुढारी ऑनलाईन : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, मालदीव, लक्षद्वीप क्षेत्र, संपूर्ण कोमोरिन क्षेत्र आणि दक्षिण आणि पूर्व-मध्य उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये वाटचाल केल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) शनिवारी दिली. या आठवड्याच्या शेवटी मान्सून केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित आहे. अन्यथा त्याचा पुढील प्रवास लांबण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये १० जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. (Monsoon Update)

अरबी समुद्राच्या आग्नेय भागात ५ जून रोजी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली पुढील ४८ तासांत त्याच प्रदेशावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली पुढील ४८ तासांत त्याच प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. म्यानमारच्या किनार्‍याजवळ पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर हे चक्रीवादळाचे परिवलन मध्यवर्ती स्तरावर असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

पण मान्सूनचा सध्याचा वेग पाहता यंदा त्याला विलंब होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास त्याची गती आणखी संथ होऊ शकते, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान, केरळमध्ये ५ जून रोजी आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर ३ ते ६ जून दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथे पुढील ५ दिवसांत उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

तसेच महाराष्ट्रातील विदर्भ, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात ३ ते ४ जून दरम्यान आणि उत्तर प्रदेशच्या आग्नेय भागात ६ ते ७ जून दरम्यान उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दमट आणि उच्च तापमानामुळे छत्तीसगडचा मध्य भाग आणि महाराष्ट्रात ३ आणि ४ जून रोजी उष्मा वाढण्याची शक्यता आहे. (Monsoon Update)

 हे ही वाचा :

Back to top button