Rahul Gandhi vs BJP : राहुल गांधींकडून देशाची प्रतिमा मलीन करण्यासाठी विदेशी भूमिचा वापर, भाजपची जोरदार टीका | पुढारी

Rahul Gandhi vs BJP : राहुल गांधींकडून देशाची प्रतिमा मलीन करण्यासाठी विदेशी भूमिचा वापर, भाजपची जोरदार टीका

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Rahul Gandhi vs BJP : काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) 10 दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दरम्यान बुधवारी त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठात दिलेल्या भाषणावर भाजपने आक्षेप नोंदवला. कॅलिफोर्नियात काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना संपूर्ण देशाचा अपमान करीत आहेत, अशा शब्दात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला.

माजी केंद्रीय मंत्री, भाजप नेते रविशंकर प्रसाद (Ravishankar prasad) यांनी देखील राहुल गांधींवर तोंडसुख घेतले आहे. ‘प्रेमाचा संदेश हे एक निमित्त आहे. राहुल गांधी द्वेषाचा बाजार भरवत आहेत,’ अशी टीका त्यांनी केली. जगभरात फिरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात द्वेष पसरवणे, यालाच त्यांचे प्राधान्य आहे. द्वेषाचे दुकान चालवण्यासाठी ते निघाले आहेत. राहुल गांधी संस्थांचा सन्मान करीत नाहीत, पंरतु विदेशात जावून ते रडगाणे गातात, असा टोला ही प्रसाद यांनी लगावला. पंतप्रधानांची लोकप्रियता राहुल गांधींच्या पचनी पडत नाही. काँग्रेस नेत्यांनी परदेशात भारताची प्रतिमा मलीन करण्याचे लक्ष्य निश्चित केल्याचा असा दावा देखील त्यांनी केला. (Rahul Gandhi vs BJP)

‘फेक गांधी’ असे संबोधत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (Pralahd Joshi) यांनी राहुल गांधींवर (rahul gandhi) टिकास्त्र डागले. संस्कृतीच भारताची आत्मा आहे. देशाची प्रतिमा मलीन करण्यासाठी विदेशी भूमिचा वापर तुम्ही करता. देशाला आपल्या इतिहासावर गर्व आहे, अशी संतप्त भावना जोशी यांनी व्यक्त केली.

राहुल गांधींची भाजपवर जहरी टीका (Rahul Gandhi vs BJP)

भाजप नागरिकांना धमकावत आहे. सरकारी संस्थांचा दुरूपयोग करीत आहे. नागरिकांसोबत जुळण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व साधनांवर भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियंत्रण आहे. यासाठीच भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आली, असे वक्तव्य भाषणादरम्यान राहुल यांनी केले होते. राजकीय रुपात कार्य करणे अत्यंत कठीण झाले आहे, यासाठीच आम्ही भारताच्या दक्षिणेकडून श्रीनगर पर्यंत पदयात्रा करण्याचा निर्णय घेतल्याचे राहुल म्हणाले होते.

Back to top button