२०२३-२४ मध्ये ‘जीडीपी’ ६.५ टक्के; देशातील महागाईही होणार कमी; रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवाल | पुढारी

२०२३-२४ मध्ये ‘जीडीपी’ ६.५ टक्के; देशातील महागाईही होणार कमी; रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवाल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यानुसार चालू आर्थिक वर्षात (2023-24) जीडीपी वृद्धी दर 6.5 टक्के राहील, हा यापूर्वीच वर्तविलेला अंदाज कायम ठेवलेला आहे, त्यासह देशात महागाईचा धोका कमी झालेला असल्याचेही स्पष्ट केले आहे.

आगामी काळात महागाई अधिक आटोक्यात आलेली असेल, असे भाकीत वर्तविताना 2023-24 साठी महागाईचा अनुमानित दर 5.2 टक्के ठेवलेला आहे.

चांगल्या मान्सूनमुळे महागाईत होणार घट

यंदा देशात मान्सूनची स्थिती उत्तम असणार आहे. अल-निनोमुळे (समुद्रातील स्थितीमुळे चक्रीवादळ) संभाव्य अपवादात्मक परिस्थिती टळली, तर 2023-24 मध्ये महागाई आणखी कमी होईल. घाऊक महागाई दर 2023-24 मध्ये 5.2 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्षात घाऊक महागाई दर 6.7 टक्के होता.

डिजिटल रुपया विस्तारणार

जागतिक अनिश्चितता कायम असल्याने भारतीय बाजारपेठेतील परकीय गुंतवणुकीबाबत चढ-उतार दिसून येतील. यंदा डिजिटल रुपया आणखी अन्य क्षेत्रांतून तसेच विस्तारित स्वरूपात सुरू केला जाईल. गतवर्षी 1 डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने किरकोळ डिजिटल रुपयाचा (ई-रुपी) उपक्रम सुरू केला होता.

‘जीडीपी’ म्हणजे काय?

अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे, ते सांगणारा जीडीपी हा एक निर्देशांक आहे. विशिष्ट कालावधीत देशामध्ये उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे मूल्य यातून दर्शविले जाते. हा निर्देशांक उत्तम स्थितीत असला म्हणजे रोजगाराची स्थितीही उत्तम असल्याचे गृहीत धरले जाते.

Back to top button