होस्पेटजवळ अपघात; सोलापूरचे सहा ठार

बंगळूर : ट्रक व कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. होस्पेटजवळील (जि. विजयनगर) दोट्टीहाळ गावाजवळ रविवारी (दि. 28) रात्री हा अपघात झाला. मृतांमध्ये पती-पत्नी व त्यांची दोन मुले तसेच त्यांच्या दोन नातेवाईकांचा समावेश आहे. मृत मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून यात्रेनिमित्त मूळ गावाला भेट देऊन हे कुटुंब बंगळूरला परतत होते.
राघवेंद्र सुभाष कांबळे (वय 25), पत्नी जानू राघवेंद्र कांबळे (वय 23), मुलगा राकेश राघवेंद्र कांबळे (वय 5), मुलगी रश्मिका राघवेंद्र कांबळे (वय 2), राजप्पा बनगोडी व अक्षय शिवशरण अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, राघवेंद्र कांबळे बंगळूरमधील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. ते पत्नी आणि दोन मुलांसह बंगळूरमध्येच राहत होते. आपल्या कुटुंबासह ते दक्षिण सोलापूरमधील लवंगी या मूळ गावी यल्लम्मा यात्रेसाठी आले होते. रविवारी यात्रा संपवून ते बंगळूरला निघाले होते. विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील नंद्राळमध्ये त्यांची बहीण राहते. तेथील दोन नातेवाईकांना घेऊन ते पुढचा प्रवास करत होेते. होस्पेटनजीक अचानक समोरुन आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला जोराची धडक बसली. या भीषण अपघातात कारमधील सहाजणांचा जागीच मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील सर्व मृत असल्याने लवंगी गावावर शोककळा पसरली आहे. राघवेंद्र कांबळे हे एकुलते एक होते. वडील सुभाष आणि आई इंदुमती यांना या घटनेची माहिती समजताच धक्का बसला आहे. या घटनेची नोंद कर्नाटकातील कुष्ठगी पोलीस स्थानकात झाली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने प्रत्येकी 2 लाखाची मदत जाहीर केली आहे.