

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये रविवारी (दि. 29) पुन्हा राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विद्रोही गट आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक झाली. सुत्रांच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी इम्फाल घाटी आणि आसपासच्या परिसरात 5 ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या. आतापर्यंत राज्यामध्ये 40 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी दिली. शिवाय काही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाने अटक केली आहे. ही कारवाई दहशतवादी गटांविरुद्ध प्रति आणि बचावात्मक कारवाईचा भाग म्हणून करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी सुरक्षा यंत्रणा आणि मणिपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती देताना सांगितले की, ज्या दहशतवादी समूहाविरोधात कारवाई करण्यात आली आहे ते लोक अत्याधुनिक शस्त्रांनी हल्ले करत होते. ते नागरिकांवर एम-16 आणि एके-47 असोल्ट रायफल आणि स्नाइपर गनचा वापर करत होते. दहशतवादी समूहाचे लोक अनेक गावांमध्ये घुसून घरे जाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे सेना आणि अन्य सुरक्षा दलांनी फायरिंग सुरु केली. दहशतवादी नि:शस्त्र नागरिकांवर हल्ले करून तोडफोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सचिवालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, चकमकी दोन समुदायांमध्ये नसून कुकी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये आहेत. मणिपूरमध्ये हिंसा कमी व्हायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत.
बिरेन सिंह म्हणाले की, आम्ही इतके दिवस अडचणी अनुभवल्या आणि आम्ही राज्याचे कधीही विघटन होऊ देणार नाही. ते म्हणाले की, जाट रेजिमेंटने नागरिकांच्या हत्येमध्ये आणि मालमत्तेचे नुकसान आणि घरांची जाळपोळ करण्यात गुंतलेले अनेक कुकी अतिरेकी पकडले गेले आहेत.
अधिका-यांनी सांगितले की, शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्याने समुदायांना नि:शस्त्र करण्यासाठी शोध मोहीम सुरू केल्यानंतर पहाटे ताज्या चकमकीला सुरुवात झाली.
भारतीय जनता पक्षाचे आमदार खवैरकपम रघुमणी सिंग यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आणि त्यांची दोन वाहने इंफाळ पश्चिम येथील उरीपोक येथे जाळण्यात आली, असे एका उच्च सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले.
इम्फाळ खोऱ्याच्या आजूबाजूच्या विविध जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या सुमारास अनेक ठिकाणी चकमकी झाल्या, असेही ते म्हणाले. "आमच्या माहितीनुसार, काकचिंगमधील सुगनू, चुराचंदपूरमधील कांगवी, इंफाळ पश्चिममधील कांगचूप, इम्फाळ पूर्वमधील सगोलमांग, बिशेनपूरमधील नुनगोइपोकपी, इंफाळ पश्चिममधील खुरखुल आणि कांगपोकपीमधील YKPI येथे गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे," असे अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याने सांगितले की, काकचिंग पोलिस ठाण्यातून मेईतेई गटाने शस्त्रे लुटल्याची अपुष्ट माहिती देखील मिळाली आहे. अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा या मागणीसाठी मेईतेई समुदायाने 3 मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' काढल्यानंतर मणिपूरमध्ये जातीय संघर्षात 75 हून अधिक लोक मारले गेले. राज्यातील सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी अर्धसैनिक दलांव्यतिरिक्त, लष्कर आणि आसाम रायफल्सच्या सुमारे 140 कंपन्या, ज्यात 10,000 हून अधिक जवानांचा समावेश आहे, तैनात करावे लागले.