“अखिलेश यांच्‍या उपकाराची आठवण आहे का? …”आझम खान यांची पोलिस अधिकार्‍याला विचारणा, मिळाले सडेतोड उत्तर | पुढारी

"अखिलेश यांच्‍या उपकाराची आठवण आहे का? ..."आझम खान यांची पोलिस अधिकार्‍याला विचारणा, मिळाले सडेतोड उत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : समाजवादी पार्टीचे आमदार आझम खान आणि रामपूरमधील पोलीस अधिकारी अनुज चौधरी हे शनिवारी  ( दि. २७) आमने-सामने आले. यावेळी दोघांमध्‍ये जोरदार वादावादी झाली. आझम खान यांनी चौधरी यांना “तुम्‍हाला अखिलेश यादव यांनी तुमच्‍यावर केलेल्‍या उपकाराची आठवण आहे का ?,” अशी विचारणा केली. यावेळी पोलिस अधिकारी चौधरी यांनीही त्‍यांना सडेतोड उत्तर दिले. या घटनेचा व्हिडिओही सध्‍या उत्तर प्रदेशमध्‍ये तुफान व्‍हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं ?

समाजवादी पार्टीच्‍या शिष्टमंडळाने शनिवारी ( दि. २७) रामपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र मंदाड यांची भेट घेतली. यावेळी सपाचे माजी खासदार, आमदार आणि इतर नेते बापू मॉलजवळील एसपी कार्यालयात जमले. आझम खानही तेथे पोहोचले आणि त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी बापू मॉलजवळ पोलीस अधिकारी अनुज चौधरी, सिटी पोलीस निरीक्षक गजेंद्र सिंह, गंज पोलीस स्टेशन प्रभारी लवसिरोही यांच्यासह मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला होता. कार्यालयातून परतत असताना आझम खान यांनी मोठा पोलीस बंदोबस्‍त पाहून आपली कार थांबवली. त्‍यावेळी चौधरी आणि आझम खान यांच्‍यात शाब्‍दीक चकमक उडाली.

कुस्तीपटू आहे, अर्जुन पुरस्कार कोणाच्याही मर्जीने मिळालेले नाही

तुमचे व्‍यक्‍तिमत्त्‍व चांगले आहे. तुम्‍हाला अखिलेश यादव यांनी केलेल्‍या उपकाराची आठवण आहे का, अशी विचारणा यावेळी आझम खान यांनी अनुज चौधरी यांना केली. यावर चौधरी म्‍हणाले, मी कुस्तीपटू आहे. मला कोणाचाही मर्जीमुळे अर्जुन पुरस्कार मिळालेला नाही तर मी माझ्‍या कामगिरी तो मिळवला आहे. हे उत्तर ऐकून आझम खान आपल्‍या कारमध्‍ये बसले आणि तेथून निघून गेले. या प्रकरणाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button