चीन वसवतोय भारतीय सीमेलगत नवी गावे | पुढारी

चीन वसवतोय भारतीय सीमेलगत नवी गावे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारताविरुद्ध चीनची आगळीक थांबायला तयार नाही. आता ड्रॅगनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लडाख आणि अरुणाचल प्रदेशनंतर उत्तराखंडलगत नवी गावे वसवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार धक्कादायक बाब म्हणजे भारतीय सीमेपासून केवळ 11 कि.मी. अंतरावर चीनने हे धाडस केले आहे. भविष्यातही अशा प्रकारची गावे वसविण्याचा चीनचा विचार असल्याची माहिती उजेडात आली आहे. आता चीन या गावांच्या माध्यमातून उत्तराखंडच्या बाजूनेही भारताला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.

पीपल्स लिबरेशन आर्मीच्या देखरेखीखाली उत्तराखंडला लागून असलेल्या सीमेपासून 35 कि.मी. अंतरावर सुमारे 55 ते 56 घरे बांधण्यात चीनचा सहभाग आहे. सीमेला लागून असलेल्या पूर्वेकडील भागात 400 गावे वसवण्याची चीनची योजना आहे. याद्वारे चीन सीमेवर आपला शिरकाव वाढवत आहे. यातील प्रत्येक गावात 250 घरे असतील. तसेच ही गावे डिफेन्स व्हिलेज म्हणून ओळखली जाणार आहेत.

चीन आपल्या लोकांना सीमेजवळ वसवण्याचे काम सातत्याने करत आहे. चीनमधील ही गावे सर्व सुविधांनी सुसज्ज आहेत. दुसरीकडे, चीनच्या सीमेला लागून असलेल्या गावांमधील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. चीनच्या या आगळीकीमुळे भारतीय लष्कर सावध झाले असून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवून आहे.

Back to top button