भव्यत्वाची प्रचिती देणारे नूतन संसद भवन : चार मजली भूकंपरोधी वास्‍तू; १२७२ आसने | पुढारी

भव्यत्वाची प्रचिती देणारे नूतन संसद भवन : चार मजली भूकंपरोधी वास्‍तू; १२७२ आसने

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृतकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी देशाला संसदेची नवीन इमारत समर्पित करतील. संसदेच्या जुन्या इमारतीसमोर उभारण्यात आलेली ही वास्तू सर्वार्थाने भव्यत्वाची प्रचिती देणारी आहे. देशाच्या विविधतेचे दर्शन घडवणार्‍या या इमारतीतून आता सारा कारभार हाकला जाणार आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये

* सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बांधकाम 2019 मध्ये हाती घेण्यात आले होते. या प्रकल्पाअंतर्गत संसदेची नवी लक्षवेधी इमारत उभारण्यात आली आहे.
* या वास्तूत लोकसभा, राज्यसभेसह एक मोठे केंद्रीय सभागृह, पुस्तकालय, अत्याधुनिक सुविधांनी युक्त समिती कक्ष बनवण्यात आले आहेत. संसदेच्या नवीन वास्तूत तैनात करण्यात येणार्‍या मार्शलसाठीही खास प्रकारचा पोशाख असणार आहे.
* नव्याने उभारण्यात आलेल्या लोकसभेची संकल्पना राष्ट्रीय पक्षी मोरावर बेतली आहे. राज्यसभेची संकल्पना राष्ट्रीय फूल कमळावर आधारित आहे.
* संसद भवनाला तीन द्वार राहणार असून ज्ञान, शक्ती आणि कर्म अशी नावे या द्वारांना देण्यात आली आहे. परिसरात एक केंद्रीय लॉऊंजदेखील बनवण्यात आला आहे.
* लोकसभा, राज्यसभा आणि केंद्रीय सभागृहात वेगवेगळ्या आकाराच्या खिडक्या लावण्यात येणार असून या देशाच्या विविधतेचे प्रतीक आहेत.
* नवीन संसद भवनात सर्व खासदारांसाठी विशेष टेबलाची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ पुढील भागात बसणार्‍या खासदारांसाठी अशी रचना उपलब्ध होती.
* नवीन संसद भवनात अध्यक्षांच्या आसनाजवळ ऐतिहासिक सेन्गोल (राजदंड) ठेवण्यात येईल. जुन्या संसदेत ही व्यवस्था नव्हती. आतापर्यंत हा सेन्गोल अलाहाबाद येथील वास्तुसंग्रहालयात होता.
* खासदार आणि अतिमहनीय व्यक्तींसाठी वेगळी प्रवेशव्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने खासदारांसह सर्वांचा प्रवेश बायोमेट्रिक पासच्या आधारे होणार आहे. हातांचे ठसे आणि डोळ्यांची ओळख पटल्यानंतरच संसद भवनात प्रवेश दिला जाईल.
* संसदेत मंत्री लॉऊंजसह खासदार लॉऊंज, व्हीआयपी लॉऊंज आणि मीडिया लॉऊंजदेखील असणार आहे.
* संसदेच्या जुन्या इमारतीत असलेली मूळ संविधानाची प्रत नवीन इमारतीत ठेवण्यात येईल.
* संसद भवनात संविधान सभागृहदेखील असेल.
* ‘फूड अ‍ॅप’च्या माध्यमातून खासदारांना आता नव्या संसदेतील कॅन्टीनमधून जेवण, खाद्यपदार्थ मागवता येणार आहेत.
* संसदेच्या नव्या इमारतीत दिव्यांगासाठीही विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
* हरीत ऊर्जेला म्हणजेच ग्रीन एनर्जीला नव्या संसद इमारतीत प्राधान्य देण्यात आले आहे.

द़ृष्टिक्षेपात अमेरिका, ब्रिटन व फ्रान्समधील संसदेची रचना

* अमेरिकन काँग्रेस हे अमेरिका देशाचे विधिमंडळ आहे. याची दोन सभागृहे असून वरिष्ठ गृहाला सिनेट, तर कनिष्ठ गृहाला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज अर्थात प्रतिनिधी सभागृह असे म्हणतात. यातील सिनेटमध्ये 100 आणि प्रतिनिधी सभागृहात 435 आसने आहेत.
* ब्रिटनमध्ये संसदेची दोन सभागृहे असून त्यांची नावे हाऊस ऑफ लॉर्डस् आणि हाऊस ऑफ कॉमन्स अशी आहेत. त्यातील हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये 778 आसने असून हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 650 आसने आहेत.
* फ्रान्समध्ये अप्पर सिनेट आणि नॅशनल असेंब्ली अशी दोन सभागृहे असून त्यातील अप्पर सिनेटमध्ये 349 व नॅशनल असेंब्लीमध्ये 577 आसने आहेत.

गुजरातचे बिमल पटेल आहेत शिल्पकार

दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, वाराणसीतील काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर, अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि पुरीतील जगन्नाथ मंदिराचे मास्टर प्लॅनिंग – भारताच्या सांस्कृतिक आणि शहरी लँडस्केपची ही सर्व प्रतीके भलेही भारताच्या वेगवेगळ्या कोपर्‍यांमध्ये असतील. तथापि, त्यांचा मास्टर आर्किटेक्ट एकच आहे आणि ते म्हणजे बिमल पटेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नव्या इमारतीच्या डिझाईनची जबाबदारीही पटेल यांच्या एचसीपी कंपनीकडे सोपवली. पटेल यांना सरकारने 2019 मध्ये पद्मश्री या प्रतिष्ठेच्या नागरी बहुमानाने सन्मानित केले आहे. याखेरीज त्यांना जागतिक पातळीवरील अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. वास्तुविशारद क्षेत्रातील 35 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. बालपणीच त्यांनी शास्त्रज्ञ व्हायचे ठरवले होते. वास्तवात ते बनले रिडेव्हलपमेंट मास्टर

राजधानीतील सेंट्रल व्हिस्टा म्हणजे राजपथाच्या दोन्ही बाजूंचा परिसर

सेंट्रल व्हिस्टा म्हणजे राजपथाच्या दोन्ही बाजूंचे क्षेत्र आहे. या अंतर्गत राष्ट्रपती भवन, संसद, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, उपराष्ट्रपतींचे निवासस्थान आहे. राष्ट्रीय संग्रहालय, राष्ट्रीय अभिलेखागार, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, उद्योग भवन, बिकानेर हाऊस, हैदराबाद हाऊस, निर्माण भवन आणि जवाहर भवन हेदेखील सेंट्रल व्हिस्टाचा भाग आहेत.

Back to top button