पाकला एकाकी पाडले, चीनला रोखले परराष्ट्र धोरणाचा ‘नमो पॅटर्न’

पाकला एकाकी पाडले, चीनला रोखले परराष्ट्र धोरणाचा ‘नमो पॅटर्न’

बायडेन आपल्या जागेवरून उठून मोदींच्या दिशेने येतात… मोदींची गळाभेट घेतात… हे काही सामान्य दृश्य नाही, आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची प्रतिमा आज किती उंचावलेली आहे, हे दृश्य त्याचेच द्योतक आहे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येण्यापूर्वी रशिया वगळता अमेरिकेसह जगातील आघाडीचे देश पाकिस्तानच्या मागे भक्कमपणे उभे होते. आता चीन, पाकिस्तान एकीकडे आणि भारतासह उर्वरित जग एकीकडे असे चित्र जागतिक पटलावर आहे. पाकिस्तान आणि चीनमध्ये कर्जासह चिनी नागरिकांच्या पाकमधील हत्याकांडांमुळे वाद सुरू झालेलाच आहे. पाकिस्तान तर अगदीच एकाकी पडल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणामुळे जगासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे.

इस्रायलशी घनिष्ठ संबंध

मोदींपूर्वी इस्रायल या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या देशाशी भारत सरकारचे वैरच होते. पॅलेस्टाईनला न दुखावता इस्रायलशी घनिष्ठ मैत्री संपादन करण्यात मोदी यशस्वी ठरले आहेत.

अमेरिकेची दादागिरी मोडली

युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युरोपिय राष्ट्रांसह अमेरिकेने रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादले. भारतावरही त्यासाठी दबाव आणण्यात आला. मात्र, मोदींनी युद्धाला विरोध कायम ठेवून रशियासोबत व्यापार कायम ठेवला.

इंधन निर्यातीचा विक्रम

एवढेच नव्हे तर रशियाकडून कोणीही क्रूड ऑईल खरेदी करेनासे झाले आहे म्हटल्यावर अत्यंत स्वस्त दरात व प्रचंड प्रमाणात रशियाकडून क्रूड ऑईल खरेदी सुरू केली. हे कच्चे तेल भारतात शुद्ध केले. रशियावरील निर्बंधांमुळे युरोपात इंधन टंचाई असल्याचा लाभ घेत युरोपला इंधन निर्यात सुरू केली. युरोपला इंधन निर्यातीत भारताने चक्क सौदी अरेबियालाही मागे टाकले.

इम्रान खानकडून मोदीगौरव!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व रशियाशी व्यापार कायम ठेवण्याच्या त्यांच्या (मोदींच्या) खंबीर निर्णयाचा संदर्भ देऊन भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तोंड भरून कौतुक केले होते.

व्हिसा बंदी ते स्वागताला पायघड्या

पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर अमेरिकेने व्हिसा बंदी लादली होती. त्याच अमेरिकेला स्वागतासाठी पायघड्या घालायला मोदींनी भाग पाडले. अमेरिकेतील अत्यंत मानाचा समजला 'लिजन ऑफ मेरिट' हा पुरस्कारही मोदींना देण्यात आला.

… आणि एस-400 मिसाईल घेतलीच!

रशियाशी कायम ठेवलेल्या आर्थिक संबंधांवरून अमेरिकेने नेहमी भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोदी बधले नाहीत. रशियाकडून क्रूड ऑईलच नव्हे तर एस-400 मिसाईल खरेदी करण्याचा निर्णय भारताने घेतला, तेव्हाही अमेरिका कमालीची नाराज होती.

नया भारत हैं, रुकेगा भी नहीं, झुकेगा भी नहीं

भारतावर निर्बंध लादण्याचा निर्णयही तेव्हा अमेरिकेने घेतला होता. मात्र, मोदी पर्यायाने भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. एस-400 मिसाईलमुळे भारताची सामरिक सज्जता टोकाची वाढलेली आहे. 'ये नया भारत है, रुकेगाभी नहीं, झुकेगाभी नहीं,' हा संदेश जगाला देण्यात मोदी यशस्वी ठरले.

प्रत्येक देशात, मोदी… मोदी… मोदी…

मोदी सत्तेत येण्यापूर्वी भारतीय पंतप्रधान विदेश दौर्‍यावर गेल्यानंतर संबंधित देशातील अनिवासी भारतीयांना आपल्या मूळ देशाचे पंतप्रधान आल्याची खबरही नसे. मोदी यांनी हा ट्रेंडही बदलला. ज्या देशात मोदी जातात, त्या देशात 'मोदी, मोदी'चा गजर होतो. फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, जपानसारख्या प्रगत देशांचे राष्ट्रप्रमुख मोदींशी उत्साहाने बोलतात तिथे आफ्रिकेतील गरीब देशांनाही मोदींबद्दल आस्था आहे. ओबामा, डोनाल्ड ट्रम्प, बायडेन यांना मोदी हे वैयक्तिक पातळीवरही मित्र वाटतात. जगातील राष्ट्रांचा भारताकडे वाढत असलेला हा ओढा चीनला अस्वस्थ करतो.

भारताची व्हॅक्सिन डिप्लोमसी

  • भारताने जगातील तब्बल म्यानमार, नेपाळ, भूतान, मालदीव, बांगला देश, श्रीलंका, बहरीन, दक्षिण आफ्रिका, ओमान, इजिप्त, कुवेत, अफगाणिस्तानसह 69 देशांना 583 लाख कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस मोफत दिले. सर्वाधिक 90 लाख डोस बांगला देशला देण्यात आले.
  • लसीची निर्मिती करणारे सार्वभौम राष्ट्र भारत, अशा शब्दांत न्यूयॉर्क टाइम्स या अमेरिकन दैनिकाने भारताचा गौरव केला आणि भारताची व्हॅक्सिन डिप्लोमसी चीनला मात देण्यात यशस्वी ठरल्याचेही नमूद केले.

    मुस्लिम देश आणि मोदी

  • सौदी अरेबिया, इराण, बहरीन, ओमानसह अनेक मुस्लिम राष्ट्रांशी मैत्रीचे नाते दृढ झाले.
  • भारत-पाकिस्तानात प्रचंड तणाव असताना 2019 मध्ये संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) 57 मुस्लिम देशांच्या ओआयसी संघटनेच्या अधिवेशनाला भारताने संबोधित केले.
  • काश्मीरबाबतचे कलम 370 भारताने हटविल्यानंतर पाकिस्तानने मुस्लिम देशांना भारतावर बहिष्कार टाकावा म्हणून विनवण्या केल्या, पण हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे सांगून बहुतांश सर्व मुस्लिम देशांनी पाकिस्तानला चपराक दिली.
  • अफगाणिस्तानातील सध्याची तालिबान राजवटही मोदींकडून मदतीची अपेक्षा बाळगून आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news