New Parliament Building : नवीन संसद भवन उद्घाटन वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी | पुढारी

New Parliament Building : नवीन संसद भवन उद्घाटन वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

पुढारी ऑनलाइन डेस्क : New Parliament Building: नवीन संसद भवनाच्या उद्घटनावर आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाकडून लोकसभा सचिवालयाला नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींकडून करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाचे विधान आणि लोकसभेच्या महासचिवांना उद्घाटन समारंभासाठी दिलेले निमंत्रण भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारे आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

नवीन संसद भवन इमारतीचे उद्घाटन देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते व्हावे, असे निर्देश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. (Row over new Parliament building) सी. आर. जयासुकिन यांनी ही याचिका दाखल केली आहे. लोकसभा सचिवालयाने राष्ट्रपतींना उद्घाटन कार्यक्रमास आमंत्रित न करणे हे संविधानाचे उल्लंघन आहे, असा दावाही याचिकाकर्त्याने केला आहे.

देशाच्या नवीन संसद भवनाचे (New Parliament Building) उद्घाटन रविवारी (28 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवे या मागणीसाठी देशातील 19 विरोधी पक्षांनी यावर बहिष्कार घातला आहे. दुसरीकडे रालोआतील घटक पक्षांशिवाय चार प्रादेशिक पक्ष या कार्यक्रमात सामील होणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमास हजर राहणार असल्याची माहिती वायएसआर काँग्रेसचे नेते व आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातून दिली आहे.

New Parliament Building: संसदेची नवीन वास्तू देशाचा इतिहास, सांस्कृतिक वारसा, परंपरा तसेच सभ्यतेला आधुनिकेची जोड देण्याचा सुंदर प्रयत्न – अमित शहा

देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन येत्या रविवारी (२८ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संसदेची नवीन वास्तू देशाचा इतिहास, सांस्कृतिक वारसा, परंपरा तसेच सभ्यतेला आधुनिकेची जोड देण्याचा सुंदर प्रयत्न आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे. २८ मे रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत पंतप्रधान ही वास्तू देशाला समर्पित करतील, असे त्यांनी सांगितले.

तसेच उद्घाटन कार्यक्रमावर राजकारण न करण्याचे आवाहनही विरोधी पक्षांना त्यांनी केले आहे. उद्घाटन कार्यक्रमात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आल्याचेदेखील शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.

दरम्यान, काँग्रेस, तृणमूल, राजद, संयुक्त जद, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासह बहुतांश विरोधी पक्षांनी उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. हे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.

विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले आहे आणि त्यानुसार आम्हीही तसेच ठरविल्याची माहिती उद्धव ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी दिली.

हे ही वाचा :

नागरिकांना लवकरच ई-रेशन कार्ड, घरबसल्‍या करता येणार दुरूस्‍ती; क्‍यूआर कोडचा वापर

श्‍वास कसा घेता यावर ठरत तुमचं आराेग्‍य, जाणून घ्‍या श्वास घेण्याची योग्य पद्धत

Back to top button