पंतप्रधान नरेंद्र मोदी : द्रष्टे वैश्विक नेतृत्व | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी : द्रष्टे वैश्विक नेतृत्व

  • देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देशातील सर्वात तळाच्या आर्थिक स्तरात असणार्‍या गरिबांच्या कल्याणासाठी मोदीजींनी केलेले काम हे अत्यंत मोलाचे आहे. भारताच्या उद्याच्या वैभवशाली इतिहासाचा पाया या गरीब कल्याण अजेंड्यात आहे.

समाजाच्या तळागाळातील माणसापासून ते शेतकर्‍यांपर्यंत, महिलांपासून ते तरुणांपर्यंत, पायाभूत सुविधांपासून ते आरोग्यसेवेपर्यंत, आर्थिक आघाडीपासून ते सांस्कृतिक वारशाच्या जपणुकीपर्यंतच्या विविध क्षेत्रांमध्ये गेल्या नऊ वर्षांत देशाने घेतलेली गरुडभरारी ही प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावणारी अशीच आहे. या सर्व संकल्पांना मूर्त रूप देण्याचे काम केले ते आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी. अर्थात, भारताचे वैश्विक नेतृत्व मा. नरेंद्र मोदीजी यांनी!

मा. नरेंद्र मोदीजी एकीकडे पंतप्रधानपदाची नऊ वर्षे पूर्ण करीत असताना भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय. देशाला नवीन संसद मिळतेय. अवघ्या जगात आज भारताचा डंका आहे. कोणताही देश असो, तेथील जनता मोदीजींना ऐकायला आतुर असल्याचेच चित्र सर्वत्र आहे. एकीकडे जगातील अनेक देश आर्थिक चिंता करीत असताना भारत मात्र जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलाय आणि लवकरच आपण तिसर्‍या क्र्रमांकाची अर्थव्यवस्था असू. मा. नरेंद्र मोदीजी यांची कल्पक धोरणे आणि सर्वसमावेशक गरीब कल्याण अजेंडा याचे हे यश आहे.

कोरोनाच्या कठीण काळात खंबीरपणाने धोरणे राबवून देशाची आरोग्यसेवा त्यांनी मजबूत केलीच; पण भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या लसीचीही गरज पूर्ण झाली. त्यात आत्मनिर्भरतेचा भाव होता, हे अधिक महत्त्वाचे आहे. ही आत्मनिर्भरता साधताना त्यांनी जगाचीही चिंता केली. भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम’चा हा सर्वश्रेष्ठ जागर होता. त्याचवेळी चीनचे प्रश्न असो की पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणे असो, निर्णयातील कठोरता कशी असली पाहिजे, याचा परिचय त्यांनी दिला. हा देश आता झुकणारा नाही, हेच त्यांनी त्यातून अधोरेखित केले. युक्रेनसारख्या विषयातसुद्धा जगाने भारताकडून आशा केल्या, हेच त्यांच्या परराष्ट्रनीतीचे यश आहे. आज भारत जी-20 चे नेतृत्व करतो आहे.

देशातील सर्वात तळाच्या आर्थिक स्तरात असणार्‍या गरिबांच्या कल्याणासाठी मोदीजींनी केलेले काम हे अत्यंत मोलाचे आहे. भारताच्या उद्याच्या वैभवशाली इतिहासाचा पाया या गरीब कल्याण अजेंड्यात आहे. सामान्यांना घरकूल, शौचालय, स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन आणि सवलतीत सिलिंडर, त्याच्या आरोग्याची काळजी करताना जगातील सर्वात मोठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना, त्याला विजेची जोडणी, त्याच्या घरात नळाद्वारे पाणी यातून त्यांची देशवासीयांप्रतीची आत्मियता दिसून येते. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही अडचणीच्या काळात अन्नसुरक्षा देणारी योजना ठरली. अगदी रस्त्यावरील विक्रेत्यांना कर्ज देण्याची पंतप्रधान स्वनिधी योजना असो की, मुद्रासारख्या तरुणांच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणार्‍या योजना असोत, मोदीजींनी आपल्या योजनांपासून समाजातील एकही घटक वंचित ठेवलेला नाही.

शेतकर्‍याच्या विकासाच्या नुसत्याच गप्पा आजवरच्या सरकारांनी मारल्या. मात्र, मोदीजींच्या प्रयत्नांमुळे शेतकर्‍यांसाठी अनेक भरीव योजना राबवण्यात येत आहेत. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर गुंतवणूक करतानाच पंतप्रधान किसान सन्मान निधी, सॉईल हेल्थ कार्ड, किमान आधारभूत किमतीत तसेच खतांवरील अनुदानामध्ये वाढ तसेच पंतप्रधान कृषी सिंचन योजना या अभिनव संकल्पनांद्वारे शेतकर्‍यांच्या आयुष्यात आज आमूलाग्र बदल होत आहे.

सळसळती युवाशक्ती हा देशाचा कणा असल्याचे लक्षात घेत नरेंद्र मोदीजींनी या वर्गासाठी गेल्या नऊ वर्षांत विविध योजना आखल्या. चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर नवे शैक्षणिक धोरण आणण्यात आले आहे. आज स्टार्ट अप आणि युनिकॉर्नस् अतिशय झपाट्याने विकसित होत आहेत. कौशल्य शिक्षण हाच भविष्यकाळ असल्याने पंतप्रधान कौशल विकास योजनेतून असंख्य तरुण लाभार्थी झाले. उच्च शिक्षणासाठी नव्या आयआयएम संस्थांची स्थापना, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगाराच्या निर्माण करण्यात आलेल्या संधी, तसेच नव्या आयआयटीची, विद्यापीठांची आणि खेलो इंडिया केंद्रांची उभारणीही या काळात करण्यात आली आहे.

पायाभूत सुविधांशिवाय देशाचा विकास होऊ शकणार नाही, हे मोदीजी जाणून आहेत. त्यासाठी देशातील पायाभूत सुविधांवर त्यांचा भर आहे. देशात नवीन महामार्गांचे जाळे निर्माण झाले आहे. वंदे भारतसारखे प्रयोग रेल्वेचा चेहरामोहरा बदलत आहेत. मेट्रोने नवीन भरारी घेतली आहे. देशाच्या संरक्षणासाठी या पोलादी नेतृत्वाने अनेक निर्णय केले आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणीही केली. 370 कलम रद्द करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. संरक्षणातही आता आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताचा अतिशय गतिमान प्रवास सुरू झाला आहे.

अलीकडेच ‘मन की बात’ची शताब्दी झाली. मोदीजींनी देशवासीयांशी उभारलेला हा संवादसेतू जगाच्या पाठीवरचे एकमेव उदाहरण आहे. देशाचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठीही मोदीजींचे प्रयत्न देशवासीयांचा आनंद द्विगुणित करणारे आहेत. राम मंदिराची उभारणी असो, की काशी कॉरिडॉरसारखे प्रकल्प देशाच्या समृद्ध वारशाला आणखी भक्कम करणारे आहेत. नरेंद्र मोदीजी ही एक व्यक्ती नऊ वर्षांत देश बदलूच कसा शकते? हेच दुखणे देशभरातील विरोधकांचे आहे. असो, मोदीजींसारख्या समर्थ नेतृत्वात काम करण्याची संधी मिळणे आणि भारताच्या या समृद्ध प्रवासाचे साक्षीदार होता येणे, हाच आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. मी मा. नरेंद्र मोदीजी यांना खूप खूप शुभेच्छा देतो!

Back to top button