भारत नवभाग्यविधाता…

Narendra Modi
Narendra Modi
Published on
Updated on

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनाही अद्वितीय म्हणाव्यात अशाच ठरल्या आहेत. 'एक भारत, श्रेष्ठ भारत, आत्मनिर्भर भारत, आयुष्मान भारत, पंतप्रधान आवास योजना… अशा एक ना अनेक संकल्पनांनी भारतातील सर्वच घटकांपर्यंत त्यांचे संवेदनशील निर्णय पोहोचले आहेत.

हा नवा भारत आहे. या नव्या भारताचे नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हाती आहे. ही आपल्या सगळ्यांसाठीच मोठी भाग्याची गोष्ट आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीचा हा सलग नऊ वर्षांचा कालखंड आहे. या कालखंडात देशाने चौफेर आणि अमर्याद अशा वेगाने प्रगती साध्य केली आहे. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. जो पुढे अनंत काळापर्यंत अमीट राहील. पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी मोदी यांचे कार्य प्रेरणा देत राहील. खरं तर, या नऊ नर्षांच्या परिवर्तनशील कालखंडाचे आपण सगळे साक्षीदार ठरलो आहोत, हेदेखील आपलं भाग्य आहे. जगातील सर्वात सशक्त अशी लोकशाही आणि ठणठणीत अशी अर्थसत्ता म्हणून भारत मार्गक्रमण करत आहे. या सगळ्याचं श्रेय आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खणखणीत आणि भारदस्त अशा नेतृत्वाला द्यावंच लागेल.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील परराष्ट्र धोरण असो वा अगदी गावखेड्यातील स्वच्छता अभियान आणि घराघरांत, कुटुंबा-कुटुंबाला सतावणारा आपल्या मुलांच्या परीक्षांचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे कुटुंबप्रमुख म्हणून धीरोदात्त अशी भूमिका बजावली आहे, हे सगळ्यांनाच मान्य करावे लागेल. 'मन-की-बात' या उपक्रमातून एखाद्या देशाचा पंतप्रधान आपल्या नागरिकांशी संवाद साधतो, धोरणात्मक बाबींसह छोट्या-छोट्या समस्या अडदेशाच्या सीमेचं रक्षण करण्याची कणखर भूमिका असो किंवा आंतरराज्य संबंध, उत्तर-पश्चिम राज्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची संवेदनशील भूमिका पंतप्रधानांनी एका उत्तम दिशादर्शक-मार्गदर्शक म्हणून स्वीकारावेच लागेल. काश्मीरमधील कलम 370 चे कलम हटवण्याचे, नवे केंद्रशासित प्रदेश निर्मिती आणि राज्य निर्मितीचे पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समर्पित आणि वचनबद्ध अशा वाटचालीचा प्रत्यय दिला आहे.

संसदेच्या नव्या इमारतीचे म्हणजे 'सेंट्रल व्हिस्टा'ची उभारणी ते रामराज्याची संकल्पनेला बळ देणार्‍या अयोध्येतील श्रीराम मंदिराची निर्मिती या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीची साक्ष देणार्‍या आहेत. या गोष्टी चिरंतन आणि निरंतर राहतील. त्या आपल्या पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. खरं तर, लोकशाहीचं मूर्त रूप आणि रामराज्याची संकल्पना या महान प्रतीकांमधून पुढच्या पिढ्यांना सुपूर्द होणार आहेत, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, ज्याची नोंद इतिहासाला आणि पुढच्या कित्येक पिढ्यांना घ्यावीच लागेल.

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या सर्वदूर प्रत्येक राज्याला न्याय देण्याचा, त्या राज्यातील भाषा-वेश-संस्कृती, लोकपरंपरा यांना महत्त्व देण्याचा, त्या गोष्टी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर नेण्याचा, त्या अधोरेखित करण्याचा त्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न नजरेत भरतो.
आपल्या महाराष्ट्रालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौहार्द, सौजन्यशील आणि संवेदनशीलतेचा स्पर्श झाला आहे. महाराष्ट्रातील दौर्‍यांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वसमावेशकता अनुभवता आली आहे. केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर देशासाठी महत्त्वाकांक्षी अशा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पणापासून ते दाऊदी बोहरा समाजाच्या समारंभाला स्नेहभेट, वंदे भारत रेल्वेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुंबकीय व्यक्तिमत्त्वाची प्रचिती येत गेली.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने आम्ही दावोसमध्ये होतो, त्यावेळीही जगभरातील नेतृत्व, उद्योजक आणि मान्यवरांना भारताविषयी आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रचंड आकर्षण असल्याचे जाणवले. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य आनंद दिघे यांचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव आहे. त्यांचे आगळे स्थान आहेच. या दोहोंनंतर प्रभावशील आणि बहुआयामी नेतृत्व म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी यांचा समावेश करावा लागेल.

आमच्या ज्या-ज्या वेळी भेटी झाल्या, बातचीत झाली, संवाद झाला, त्या-त्यावेळी त्यांनी व्यक्तिगत मला मार्गदर्शन तर केलेच शिवाय आपल्या महाराष्ट्राविषयी ते भरभरून बोलत राहिल्याचे आठवते. प्रत्यक्ष कृतीतूनही त्यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी, गृहनिर्माण, नगरविकास क्षेत्रासाठी त्यांनी निधीचा मोठा ओघ महाराष्ट्राकडे वळवला आहे. याशिवाय पायाभूत सुविधांच्या बाबतीत विमानसेवा, बंदर विकास, कृषी, औद्योगिक, शिक्षण, आरोग्य यांच्यासह ग्रामविकास, सामाजिक न्याय अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी घेतलेले निर्णय आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठीही सहाय्यभूत ठरत आहेत आणि यापुढेही त्यांचे परिणाम निश्चितपणे जाणवत राहणार आहेत.

अंकशास्त्रात नऊ या अंकाला सर्वात मोठा अंक मानले जाते. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म सप्टेंबर महिन्यातला आणि त्यांच्या सलग कारकिर्दीलाही नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. नीतनवीन आणि नवनीत अशा नावीण्यपूर्ण संकल्पना, योजना, उपक्रमांनी त्यांनी भारताच्या विकासात पदोपदी योगदान दिले आहे. त्यांच्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळखही अशीच बलाढ्य देश अशी झाली आहे. संरक्षण सज्जतेसह, परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने, अर्थ आणि उद्योजकता-वाणिज्यिक संदर्भाने आता भारताला गृहीत धरता येणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे, त्यांच्या मुत्सद्दीपणामुळे, धोरणामुळे जगाने ओळखले आहे. हीच आपल्या नव्या भारताची ओळख आहे. त्या अर्थाने आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवभाग्यविधाताच आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news