देशांतर्गत विमान प्रवासी संख्येत ४२.८५% ची वाढ

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – देशांतर्गत विविध विमान कंपन्यांच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. विमान कंपन्यांनी सादर केलेल्या प्रवास विषयक आकडेवारीनुसार यंदा विमान प्रवाशांची संख्या ५०३.९३ लाखांपर्यंत पोहचली आहे. गतवर्षी हे प्रमाण ३५२.७५ लाखांच्या घरात होते.
विमान प्रवाशांच्या संख्येत त्यामुळे ४२.८५ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल-२०२२ च्या तुलनेत एप्रिल २०२३ मध्ये महिन्यागणिक वाढीचा दर २२.१८ टक्क्यांनी वधारल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली. एप्रिल २०२३ मध्ये नियोजित देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याचा एकूण दर ०.४७ इतका उल्लेखनियरित्या कमी राहिला. शिवाय दर १० हजार प्रवाशांमागे तक्रारींची संख्या एप्रिल महिन्यात ०.२८ होती.
विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून भारताचे स्थान बळकट करण्यासाठी सर्व सहभागींचे एकत्रित प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले आहेत, अशी भावना यानिमित्त केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केली. प्रवाशांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. या उद्योगाच्या भरभराटीसाठी वातावरण आणि शाश्वत विकास सुलभ करण्यासाठी तसेच सुरक्षितता, कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या समाधानाची सर्वोच्च मानके सुनिश्चित करण्यासाठी संबंधितांसोबत मंत्रालयाचे सहकार्य सुरू राहीले, असे शिंदे म्हणाले.