कर्नाटक : आमदाराकडून शिवकुमारांच्या नावे शपथ! | पुढारी

कर्नाटक : आमदाराकडून शिवकुमारांच्या नावे शपथ!

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटकच्या सोळाव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारपासून (दि. 22) सुरवात झाली. सर्वप्रथम निवडून आलेल्या सदस्यांनी आमदारपदाची शपथ घेतली. हंगामी विधानसभा अध्यक्ष आर. व्ही. देशपांडे यांनी सर्व सदस्यांना शपथ देववली. बहुतेकांनी देव, देश, संविधान, मतदार यांच्या नावे शपथ घेतली. पण, एका आमदाराने चक्क उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नावाने शपथ घेतल्याने गोंधळ झाला.

सर्वात पहिल्यांदा मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी शपथ घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी गंगाधर आजोबांच्या नावाने शपथ घेतली. पण, चन्नगिरी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बसवराज शिवगंगा यांनी चक्क शिवकुमार यांच्या नावाने शपथ घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या प्रकाराला सभागृहातून विरोध झाला. त्यावर अध्यक्ष देशपांडे यांनी हस्तक्षेप करुन कुणाही व्यक्तीच्या नावे शपथ न घेण्याची सूचना आमदार शिवगंगा यांना केली. केवळ देव किंवा संविधानाच्या नावाने शपथ घ्यावी. अन्य कोणत्याही नावाने घ्यायचे नाही, असे त्यांनी बजावले.

मंगळूर जिल्ह्यातील सुळ्य मतदारसंघाच्या आमदार भागीरथी मुरळ्य यांनी मतदार व कुलदैवतांच्या नंवाने शपथ घेतली. आमदार सतीश जारकीहोळी (यमकनमर्डी), प्रियांक खर्गे (चितापूर), रामलिंगा रेड्डी (बीटीएम लेऑउट), यु. टी. खादर (मंगळूर) आदींनी संविधानाच्या नावे शपथ घेतली. तर राज्यातील विविध पक्षांच्या बहुतेक आमदारांनी देवाच्या नावे शपथ घेतली.

Back to top button