DK Shivkumar: डीके शिवकुमार यांनी 'या' भाजप नेत्याचे केले चरणस्पर्श | पुढारी

DK Shivkumar: डीके शिवकुमार यांनी 'या' भाजप नेत्याचे केले चरणस्पर्श

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागांवर विजय मिळवत भाजपकडून सत्ता खेचून घेतली. काँग्रेसच्या या विजयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार (DK Shivkumar) यांचे मोठे योगदान राहिले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. दरम्यान, शिवकुमार यांनी बंगळूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते एसएम कृष्णा यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई यांचीही त्यांनी भेट घेतली. याआधी शपथविधी सोहळ्यादरम्यान शिवकुमार यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन प्रवेश केला होता.

कोण आहेत एसएम कृष्णा?

एसएम कृष्णा १९९९ ते २००४ पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. २००४ ते २००८ या काळात त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री हाेते.२०१७ मध्ये त्यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, एसएम कृष्णा यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. DK Shivkumar

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर १६ व्या कर्नाटक विधानसभेचे पहिले अधिवेशन आजपासून (दि.२२) सुरू होत आहे. सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार आहे. विधानसभेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांच्या अधिवेशनात सर्व २२४ नवनिर्वाचित आमदार शपथ घेतील. त्यानंतर नवीन विधानसभा सभापतींची निवडही करण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे प्रोटेम अध्यक्ष म्हणून शपथ  घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, मंत्री जी परमेश्वरा, केएच मुनियप्पा, एम.बी. पाटील, के.जे. जॉर्ज, सतीश जारकीहोळी, प्रियांक खर्गे या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

हेही वाचा 

कर्नाटक निवडणूक जिंकूनही आनंदी नाही : डीके शिवकुमार असे का म्‍हणाले?

Karnataka CM : सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री; काँग्रेसकडून अधिकृत घोषणा

DK Shivkumar: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी डीके शिवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

Back to top button