सुनाक दाम्पत्याला दोन हजार कोटींचा फटका | पुढारी

सुनाक दाम्पत्याला दोन हजार कोटींचा फटका

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इन्फोसिसच्या शेअर्सचे दर घसरल्यामुळे गेल्या वर्षभरात ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना तब्बल २०१ दशलक्ष पाउंडांचे (२, ०७२ कोटी रुपये) नुकसान झाले आहे.

ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत दाम्पत्यांपैकी एक असलेल्या सुनाक दाम्पत्याचे इन्फोसिसमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर्स आहेत. स्वतः सुनाक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आणि ब्रिटनमधील अब्जाधीश आहेत. सुनाक दाम्पत्य श्रीमंतीच्या बाबतीत ब्रिटनमध्ये २२२ व्या क्रमांकावर आहे, असा संडे टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या श्रीमंतांच्या यादीत उल्लेख आहे. मात्र, गेल्या १२ महिन्यांत इन्फोसिसच्या शेअर्सचे मूल्य तब्बल २० टक्क्यांनी घटले. त्यामुळे श्रीमंतांच्या यादीतील सुनाक दाम्पत्याचे स्थानही २२७ व्या स्थानावर घसरले. गतवर्षी या दाम्पत्याच्या संपत्तीचे मूल्य ६९० दशलक्ष पाउंड होते. यंदा ते ५२९ दशलक्ष पाउंडांवर आले आहे.

ब्रिटनमध्ये आजपर्यंत झालेल्या पंतप्रधानांमध्ये सुनाक हे सर्वांत श्रीमंत ठरले आहेत. म्हणूनच ते सर्वसामान्यांच्या संपर्कात नसतात, अशी टीका तेथील विरोधक करीत आले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून त्यांना दरवर्षी एक लाख ६५ हजार पाउंड वेतन मिळते.

ब्रिटनमधील श्रीमंत अनिवासी भारतीय

संडे टाइम्स रिच लिस्ट २०२३ मध्ये भारतीय वंशाच्या हिंदुजा कुटुंबाच्या संपत्तीचे मूल्य ब्रिटनमध्ये सर्वाधिक, ३५ अब्ज पाउंड एवढे होते. या कुटुंबाचे प्रमुख श्रीचंद हिंदुजा यांचे नुकतेच लंडनमध्ये निधन झाले. संडे टाइम्सच्या यादीतील ‘टॉप टेन’ श्रमंतांमध्ये डेव्हिड आणि सायमन रूबेन हे अनिवासी भारतीयदेखील आहेत. त्यांच्या संपत्तीचे मूल्य २४.३९९ अब्ज पाउंड आहे. या यादीत सहाव्या क्रमांकावर आर्सेलर मित्तल कंपनीचे लक्ष्म एन. मित्तल आहेत. त्यांच्या संपत्तीचे मूल्य १६ अब्ज पाउंड आहे. त्यापाठोपाठ २२व्या क्रमांकावर वेदांता रिसोर्सेस कंपनीचे अनिल अग्रवाल आहेत. त्यांची मालमत्ता ८ अब्ज पाउंड आहे.

Back to top button