karnataka cm name
karnataka cm name

Karnataka CM oath taking ceremony | सिद्धरामय्यांचा आज शपथविधी; शक्तिप्रदर्शन भाजपविरोधी! ८ राज्यांचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री उपस्थित राहणार

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : आठ राज्यांचे मुख्यमंत्री, चार माजी मुख्यमंत्री, देशातील प्रमुख विरोधी पक्ष नेते, भाजपेतर पक्षांचे खासदार अशा राष्ट्रीय नेत्यांच्या मांदियाळीत शनिवारी दुपारी 12.30 वा. येथील कंठिरवा स्टेडियमवर कर्नाटकाचे 32 वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार शपथ घेतील. शपथविधी काँग्रेसच्या नेत्यांचा असला तरी या सोहळ्याला काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सपासून तमिळनाडूमधील द्रमुक पक्षापर्यंत भाजपेतर सार्‍याच पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा शपथविधी म्हणजे भाजपविरोधी शक्तीप्रदर्शन आणि पुढच्या वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा काँग्रेस आघाडीचा बिगुलच मानला जात आहे. नेत्यांबरोबरच स्टेडियमवर सुमारे दोन लाख लोक शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. (Karnataka CM oath taking ceremony)

मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात12 मंत्र्यांचा समावेश राहील

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासह माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पुदुचेरीचे मुख्यमंत्री रंगस्वामी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे प्रतिनिधी, माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, संयुक्त जनता दलाचे खासदार लल्लन सिंग, रासपचे खासदार एम. के. रामचंद्रन, एमडीएमकेचे खासदार वायको यांच्यासह यूपीए मित्र पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे एकप्रकारे हे भाजपविरोधी शक्तिप्रदर्शनच असेल, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

भाजपेतर सगळ्या पक्षांना एकत्र आणून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करता येईल, असा काँग्रेसचा अंदाज आहे. त्यामुळेच आठ राज्यांचे मुख्यमंत्री, चार राज्यांचे माजी मुख्यमंत्री तसेच सगळ्या प्रमुख पक्षांच्या मुख्य नेत्यांना सिद्धरामय्यांच्या शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करण्यात आले आहे. भाजपेतर दुसरी आघाडी करण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न आहे. सगळ्या नेत्यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. पैकी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांचा ऐनवेळी कर्नाटक दौरा रद्द झाला असून त्यांचे प्रतिनिधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

Karnataka CM oath taking ceremony : मान्यवरांना झेड प्लस सुरक्षा

सोहळ्यास उपस्थित राहणार्‍या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री व व्हीआयपींना झेड प्लस व झेड कॅटेगरीची सुरक्षा पुरविली जाणार आहे. तसेच सीआरपीएफ, ए. एस. एल. पथकांचा गराडा असणार आहे. 12 एसीपी, 11 राखीव पोलिस निरीक्षक, 11 राखीव उपनिरीक्षक, 24 सहायक राखीव उपनिरीक्षक, 206 पोलिस कॉन्स्टेबल फक्त नेत्यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त आहेत.

अतिरिक्त पोलिस बंदोबस्त

शपथविधी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी दोन पोलिस आयुक्तांसह अतिरिक्त पोलिस आयुुक्तांच्या नेतृत्वाखाली आठ डीसीपी, 10 एसीपी, 28 इन्स्पेक्टर, 1500 हून अधिक पोलिस व रहदारी नियंत्रणासाठी 500 रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी प्रवेशासाठी स्वतंत्र सोय केली असून, 2 गेटमधून व्हीव्हीआयपी वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.

Karnataka CM oath taking ceremony : मंत्रिपदासाठी मोठे लॉबिंग

मंत्रिमंडळात सामिल होण्यासाठी आमदारांनी मोठे लॉबिंग सुरू केले आहे. काही जण समाजाच्या स्वामींकडून दबाव आणत आहेत, तर काहीजण थेड हाय कमांडकडे मागणी करत आहेत. कालपासून अनेकजण सिध्दरामय्या व शिवकुमारांच्या घरच्या वार्‍या करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही नवख्या चेहर्‍यांनाही मंत्रिपदाचे स्थान मिळण्याची शक्यता आहे.

मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार

शरणप्रकाश पाटील, शिवलिंगेगौडा, शिवराज तंगडगी, पुट्टरंगशेट्टी, अल्लमप्रभू पाटील, शरणबसप्पा दर्शनापूर, तन्वीर सेठ, सलिम अहमद, नागराज यादव, रुपा शशीधर, एस. आर. श्रीनिवास, चेलुवरायस्वामी, एम. पी. नरेंद्रस्वामी, मागडी बालकृष्ण, राघवेंद्र हिटनाळ, बी. नागेंद्र, के. एच. मुनियप्पा, आर. बी. तिम्मापूर, शिवानंद पाटील, एस.एस. मल्लिकार्जुन, रहीम खान व बैरती सुरेश.

हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news