पाच वर्षांत जगाचे तापमान विक्रम गाठणार; जागतिक हवामान संघटनेचा इशारा

पाच वर्षांत जगाचे तापमान विक्रम गाठणार; जागतिक हवामान संघटनेचा इशारा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : येत्या पाच वर्षांत जगाचे तापमान विक्रमी पातळी गाठणार असून २०२३ ते २०२७ ही आजपर्यंतची सर्वांत जास्त ऊष्ण पाच वर्षे ठरणार आहेत. यातील एका वर्षी २०१६ मध्ये झालेला तापमानवाढीचा विक्रमही गाठला जाईल, असे जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) म्हटले आहे.

तापमानवाढीस हरितगृह वायू (ग्रीन हाऊस गॅसेस) आणि अल नीनोसारखी नैसर्गिक संकटे कारणीभूत ठरणार आहेत. पूर्व प्रशांत महासागरात अल नीनो परिस्थिती ज्या वर्षी उद्भवते, त्याच्या पुढच्या वर्षात जागतिक तापमान वाढते. त्यामुळे २०२४ मध्ये तापमानाचा विक्रम गाठला जाण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएमओने जेव्हामध्ये हवामानाचा हा अहवाल प्रसिद्ध केला. २०२३ ते २०२७ दरम्यान तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता ६६ टक्के असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या पाच वर्षांत भूपृष्ठावरील तापमान सन १८५० ते १९०० दरम्यानच्या सरासरीपेक्षा १.१ ते १.८ अंश सेल्सिअसने वाढेल, असा अंदाज त्यात व्यक्त करण्यात आला आहे. अर्थात, ही परिस्थिती प्रदीर्घ काळापर्यंत राहणार नाही. वाढलेले तापमान पुन्हा पूर्ववत होईल, असे डब्ल्यूएमओचे महासचिव पेट्टेरी तालस यांनी हा अहवाल सादर करताना म्हटले आहे.

पॅरिस करारानुसार सर्व देशांना हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते गाठण्याचा प्रयत्न झाला तर तापमानवाढीचा धोका कमी होऊ शकेल. अन्यथा या शतकात सर्वत्र किमान दोन अंश सेल्सअस तापमानवाढीचा इशारा देण्यात आला आहे. ही वाढ दीड अंश सेल्सिअसच्या मर्यादेत ठेवण्याचे आव्हान प्रत्येक देशापुढे आहे, असे या अहवालात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरसरकार समितीने वातावरण बदलावर इशारा दिला आहे. दीड अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानवाढ झाली, तर नैसर्गिक आणि मानवी क्रियांवर विपरीत परिणाम होणार असल्याचे या इशाऱ्यात म्हटले आहे.

येत्या २२ मे ते २ जूनदरम्यान जागतिक हवामान काँग्रेसची बैठक होऊ घातली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. वातावरण आणि हवामान सेवेचे सशक्तीकरण हा या बैठकीचा उद्देश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news